अंतर्गत गटबाजीने काँग्रेसचे पाय खोलात

शेखलाल शेख
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्‍यता आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पैशेवाल्यांनाच पदाची खैरात वाटल्यामुळे सच्चे कार्यकर्ते इतर राजकीय पक्षांची वाट धरताना दिसत आहेत. आधीच जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांमधून विस्तवही जात नाही, त्यातच आता तालुकाध्यक्षांच्या निवडीवरून देखील काँग्रेस पक्षात गटबाजी फोफावल्याचे चित्र आहे. ही निवड प्रक्रिया थांबलेली असली तरी पक्षातील कार्यकर्ते कमालाचे नाराज झाले आहेत.

औरंगाबाद - नेत्यांची मनमानी आणि तालुकास्तरावर पोचलेल्या गटबाजीचा फटका काँग्रेसला ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बसण्याची शक्‍यता आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पैशेवाल्यांनाच पदाची खैरात वाटल्यामुळे सच्चे कार्यकर्ते इतर राजकीय पक्षांची वाट धरताना दिसत आहेत. आधीच जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांमधून विस्तवही जात नाही, त्यातच आता तालुकाध्यक्षांच्या निवडीवरून देखील काँग्रेस पक्षात गटबाजी फोफावल्याचे चित्र आहे. ही निवड प्रक्रिया थांबलेली असली तरी पक्षातील कार्यकर्ते कमालाचे नाराज झाले आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेला सिलसिला अद्यापही थांबलेला नाही. 

केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील फडणवीस सरकारविरुद्ध जनेतच्या मनात तीव्र असंतोष आहे. नोटाबंदी, कर्जमाफी, वाढती महागाई, जीएसटीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आलेला आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने जनतेच्या संतापाला वाचा फोडून तीव्र आंदोलन छेडण्याची गरज असताना ते एकमेकांना खाली खेचण्यातच व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. 

एकमेकांचे पाय खेचण्यात आणि प्रत्येक तालुक्‍यात, विधानसभा मतदारसंघात नेते ‘मेरी मर्जी’प्रमाणे वागत असल्याने जुने कार्यकर्ते दुखावत चालले आहेत.

आर्थिक ताकद पाहून पदांचे वाटप 
काँग्रेस पक्षाने नुकत्याच जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्षांच्या नेमणुका केल्या; मात्र त्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती. याची दखल घेऊन पक्षाने ही प्रक्रिया थांबविली असली तरी फुलंब्री आणि औरंगाबाद तालुकाध्यक्षांच्या निवडीवरून देखील कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. 

इतर तालुक्‍यांतही अशीच खदखद जाणवते. आगामी निवडणुकीत आपल्या पाठीशी आर्थिक ताकद कोण उभी करू शकले अशाच व्यक्तींना पदांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप काही कार्यकर्ते करताना दिसत आहेत. नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेता मनमानी केल्यामुळे औरंगाबाद तालुक्‍यातील काही महत्त्वाचे पदाधिकारी, कायकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. काही कार्यकर्ते आपला गट, गण, गावातील परिस्थितीनुसार इतर पक्षांची वाट धरत आहे. जिल्हा परिषद, पंचाययत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सिल्लोड-सोयगाव, औरंगाबाद-फुलंब्री विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतर ठिकाणी अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही; परंतु वरील तालुक्‍यात ज्यांनी पक्षाला ‘अच्छे दिन’ दाखविले त्यांना तरी मानाचे पान मिळेल ही काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. परिणामी तालुका, गावपातळीवरील कार्यकर्तेही काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारी आहेत.

शहर, जिल्हा काँग्रेसमध्ये दुफळी
सध्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या आंदोलनापेक्षा त्यांच्यातील अंतर्गत गटबाजीचीच अधिक चर्चा होताना दिसते. शहराध्यक्ष नामदेव पवार आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार या दोन नेत्यांमधील बेबनावामुळे काँग्रेसच्या आंदोलनातील गटबाजीची चर्चा होते. पेट्रोल-गॅसच्या भडकलेल्या किमतीच्या विरोधात काँग्रेसने काल क्रांती चौकात आंदोलन केले. त्याकडे जिल्हाध्यक्ष सत्तार व त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरविली. त्यामुळे या आंदोलनातून ही गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. मंगळवारी (ता.१९) माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी स्वतंत्रपणे रास्ता रोको केला. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी किती तीव्र स्वरूपाची आहे, हे दिसून येते. शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांमध्येच संवाद नसेल तर ते कार्यकर्त्यांना एकत्रित कसे आणणार, असा प्रश्‍न सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news politics in congress