मोदी सरकारने फुगविला विकासदर - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - 'मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून, अपयश झाकण्यासाठी विकासदर मोजण्याची व्याख्याच बदलून तो दोन टक्‍क्‍यांनी फुगवून सांगितला जात आहे,''

औरंगाबाद - 'मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून, अपयश झाकण्यासाठी विकासदर मोजण्याची व्याख्याच बदलून तो दोन टक्‍क्‍यांनी फुगवून सांगितला जात आहे,''

अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली. भाजपचे माजी मंत्रीच अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करीत असल्याने पंतप्रधानांनी खरे काय ते खुलासा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त औरंगाबादेत आलेले चव्हाण पत्रकारांसोबत बोलत होते. शेतकरी, व्यापारी, उद्योजक, बेरोजगार तरुणांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे असंतोष आहे. याविरोधात लवकरच कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. विकासदर 5.7 असल्याचे सरकार सांगत आहे; मात्र प्रत्यक्षात 3.7 एवढा विकासदर घसरल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उद्योगाचा विकासदर 1.2, तर बांधकाम व्यवसायाचा दर उणेमध्ये आहे. देशात नवीन उद्योग यायला तयार नाहीत. 2016 मध्ये सहा हजार उद्योगांनी नव्या प्रकल्पांसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात आठशे उद्योगांत गुंतवणूक झाली. "सीएमआय' या संघटनेने गेल्या काही महिन्यांत 15 लाख रोजगार कमी झाल्याचा दावा केला आहे. सरकार मात्र चुकीची धोरणे बदलण्यास तयार नाही,'' असा आरोपही त्यांनी केला.

मदतीची मानसिकता नाही
राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचे 34 हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. फक्‍त 58 लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत; मात्र 35 हजार कोटींची तरतूद शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे. ही कर्जमाफी पाच हजार कोटींच्या वर जाणार नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दीड लाखाची अट काढून संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे. कृषी विम्यासाठी मुदत ठेवू नये. मुख्यमंत्री कर्जमाफीमुळे बॅंकांचाच फायदा होतो, असे सुरवातीपासून सांगत आहेत. त्यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना नाहीच, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

Web Title: aurangabad marathwada news prithviraj chavan talking on modi government