न्यायासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना

न्यायासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना

औरंगाबाद - ‘‘हजारो वर्षांच्या आपल्या वैदिक परंपरेत लोकन्यायालयाची संकल्पना अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडून ती प्रभावीपणे राबविण्यातही यायची. आज लोकांचे, लोकांनी चालविलेले लोकांच्यासाठीचे लोकन्यायालय त्या समृद्ध परंपरेचाच भाग आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांत दाखल प्रकरणांची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांत तरी सर्वसामान्यांना तत्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे,’’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे ताहिलरामानी यांनी व्यक्त केले. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती श्रीमती ताहिलरामानी यांच्या हस्ते या लोकन्यायालयाचे उद्‌घाटन झाले.
 व्यासपीठावर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. देशमुख उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे चेअरमन न्यायमूर्ती बोर्डे यांच्या आदेशावरून या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती ताहिलरामानी यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करताना, सामंजस्याने, परस्पर संमतीने आणि तडजोडीने निकाली निघणाऱ्या, लोकन्यायालयातील प्रकरणांमुळे सर्वच पक्षांना खरा न्याय मिळाल्याचे समाधान मिळते, असे सांगितले.

या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली निघत असल्याने कायद्याचे राज्य आणि लोकशाहीला ही बाब अत्यंत पूरक आहे, असेही त्या म्हणाल्या. 

एक हजार प्रकरणे निकाली 
औरंगाबादमध्ये गेल्या वर्षभरात आयोजित लोकन्यायालये आणि त्यात दाखल प्रकरणे, तसेच निकाली निघालेल्या प्रकरणांची आकडेवारीही सादर करण्यात आली. आजपर्यंत आयोजित चार लोकन्यायालयांत एकंदर दोन हजार ५६३ प्रकरणे दाखल होऊन एक हजार २५६ प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील आयोजनाने राष्ट्रीय पातळीवर उच्चांक केल्याचेही त्यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणे तसेच भूसंपादन केल्यापोटी व शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी दाखल प्रकरणांवर सुनावणी झाली. कार्यक्रमाला खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, लोकन्यायालयात आज सहभागी झालेले निवृत्त न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, वकीलवर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com