आरोग्य शिबिराच्या नावाखाली लोकांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याची योजना असल्याची थाप मारून आरोग्य शिबिर घेण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29) अटक केली. दिलीप मंगरूसा गुप्ता (वय 32, रा. बीड, मूळ रा. रांची, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे.

औरंगाबाद - केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याची योजना असल्याची थाप मारून आरोग्य शिबिर घेण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. 29) अटक केली. दिलीप मंगरूसा गुप्ता (वय 32, रा. बीड, मूळ रा. रांची, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काल्डा कॉर्नर (चेतनानगर) येथे दिलीप गुप्ता याने स्पर्श पब्लिक हेल्थ नावाने कार्यालय उघडले होते. तेथे जिल्हा प्रकल्प अधिकारी, गट प्रकल्प अधिकारी व सर्व्हेअर, मॅनेजर अशा बनावट पदांवर आठ ते दहा जण काम करत होते.

तालुक्‍यांमध्ये सर्वेक्षण करून ते नागरिकांकडून फॉर्म भरून घेत होते. आरोग्य शिबिरात निःशुल्क तपासणी करून तुमच्या आरोग्याचे सर्व प्रश्‍न मार्गी लावले जातील, असे सांगून ते नागरिकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेत होते. याबाबत फसवणूक झालेल्या व्यक्तीने गुन्हे शाखा पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेने गुप्ताच्या कार्यालयावर छापा टाकत त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर खरी माहिती पुढे आली.

पोलिसांनी स्पर्श हेल्थ क्‍लबच्या कार्यालयातून बनावट पत्रके, नेमणूक प्रमाणपत्र, विविध बॅंकांचे चेकबुक, एटीएम कार्ड, सिम कार्ड, हॅंडसेट, रोख रक्कम, राजस्थान सरकाचे पत्रक, असे एकूण एक लाख 15 हजार 710 रुपयांचे साहित्य जप्त केले.

गुप्ता याने सहा महिन्यांपूर्वी आरोग्य शिबिराच्या नावाखाली राजस्थानातील पाचशेहून अधिक तरुणांना नोकरीची स्वप्ने दाखवून गंडवल्याचे समोर आले. तेथून सुमारे सात लाखांपेक्षा जास्त रक्कम उकळून त्याने गाशा गुंडाळला होता. त्याच्याविरुद्ध तेथे शामनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

झारखंड, महाराष्ट्रातील कारनामे
फसवणूक करायची आणि बिंग फुटण्याआधी पसार व्हायचे, अशी त्याची गुन्ह्याची पद्धत होती. झारखंडमध्ये त्याने सुमारे अडीचशे जणांना गंडवले आहे. तर नाशिक, औरंगाबाद येथे कार्यालय थाटून त्याने तरुणांना नोकरीची स्वप्ने दाखवल्याची बाब समोर आली आहे.

Web Title: aurangabad marathwada news publich cheating in health camp