मोहिमेचा खर्च लाखात, वसुली मात्र हजारात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य पथकाने नांदेड विभागाच्या औरंगाबाद आणि परभणी रेल्वेमार्गावर विशेष तिकीटतपासणी मोहीम राबवली. मात्र या तपासणी मोहिमेबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले आहे. नांदेड विभाग वारंवार कारवाया करून लाखो रुपये दंड वसूल करत आहे. असे असताना, लाखो रुपये खर्च करून आलेल्या या पथकाच्या कारवाईने हजारामध्ये दंड वसूल करून काय साध्य केले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे औरंगाबाद रेल्वेमार्गावर दररोज तपासणी केली जाते. आठवड्याला विशेष मोहीम राबविली जाते. पंधरा दिवसाला वाणिज्य पथकामार्फत व्यापक कारवाई केली जाते. या पथकांच्या माध्यमातून महिन्याकाठी लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. असे असताना दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एन. एम. शेखरन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी (ता. एक) औरंगाबाद रेल्वेस्थानकावर अचानक तपासणी मोहीम राबविली. ही कारवाई करताना नांदेड विभागाच्या एकाही अधिकाऱ्याला सोबत घेतले नाही. या पथकाने केवळ तिकीट तपासणी केली नाही, तर प्रवाशांबरोबर अक्षरश: गुंडगिरी केली. शेखरन यांच्या नेतृत्वाखालील ३८ तिकीटतपासणीस व अन्य कर्मचारी अशा पन्नास जणांचा ताफा विशेष रेल्वे कोचने (सुलन) औरंगाबादेत पोचला. या विशेष कोचचा आणि पन्नास जणांच्या एका दिवसांचा खर्च पाच लाखाच्या जवळपास गेला असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा लाखोंचा खर्च करताना वसुली मात्र हजारांमध्ये झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.