जुलै सरत आला तरी पाऊस मनावर घेईना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मराठवाड्यात केवळ शिडकावा, रिमझिम

औरंगाबाद - मराठवाड्यात पावसाची अवकृपा सुरूच आहे. राज्यात मॉन्सून जोरकसपणे सक्रिय झालेला असताना या भागाला केवळ रिमझिमवरच समाधान मानावे लागत आहे. जुलैचे वीस दिवस उलटले तरी ही स्थिती असल्याने अस्वस्थतेत मोठी भर पडत आहे.

मराठवाड्यात केवळ शिडकावा, रिमझिम

औरंगाबाद - मराठवाड्यात पावसाची अवकृपा सुरूच आहे. राज्यात मॉन्सून जोरकसपणे सक्रिय झालेला असताना या भागाला केवळ रिमझिमवरच समाधान मानावे लागत आहे. जुलैचे वीस दिवस उलटले तरी ही स्थिती असल्याने अस्वस्थतेत मोठी भर पडत आहे.

मराठवाड्यात जूनच्या सुरवातीला मॉन्सूनपूर्व चांगल्या सरी कोसळल्या. त्यामुळे बहुतांश भागात पेरणी झाली. पिकांची चांगली उगवण होत असताना पावसाने वीस ते पंचवीस दिवस दडी मारली. दरम्यानच्या काळात गेल्या आठवड्यापासून राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आणि ठिकठिकाणी तो धो धो कोसळू लागला. त्यात कोकण आणि नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. मराठवाड्यात मात्र केवळ शिडकावा, रिमझिम होत आहे, तीही काही भागात आणि काही अवधीपुरतीच. कधीतरी, कुठेतरी पडणाऱ्या या अत्यल्प पावसाने पिकांना टवटवी आली असली तरी चांगली वाढ, चांगल्या उत्पादनाची चिंता अजूनही टळलेली नाही. त्याशिवाय सर्वच भागात पाऊस होत नसल्याने दुबार पेरणीच्या संकटाचे काळे ढग सरलेले नाहीत. नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्पात पाण्याची आवक होत आहे, एवढा दिलासा सोडला तर मराठवाड्यातील अन्य एकाही मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्पांत थेंबभर पाणी साचलेले नाही. त्यामुळे शेतीसह पाणीप्रश्‍न सध्या तरी कायम आहे.

बहुतांश भागांत हुलकावणीच
गेल्या तीन-चार दिवसांपासून काही भागांत पावसाची हुलकावणी, कुठेतरी रिमझिम, मध्यम सरी असे चित्र आहे. गुरुवारी (ता. २०) तर बहुतांश भागात असेही चित्र नव्हते. परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी रिपरिप झाली. उस्मानाबाद शहरात सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत अधूनमधून रिपरिप सुरू होती. औरंगाबाद शहरात दुपारी आकाश काळेकुट्ट झालेले असताना केवळ दहा मिनिटे हजेरीपुरता पाऊस झाला. नांदेड, हिंगोली, लातूर, बीड जिल्ह्यांत किरकोळ अपवाद वगळता पावसाची हुलकावणीच होती.