श्रावण सरता सरता... दिवसभर वरुणराजाची रिमझिम

श्रावण सरता सरता... दिवसभर वरुणराजाची रिमझिम

दोन दिवसांत ७६ मिमी पावसाची नोंद ः जिल्ह्यातही बरसल्या सरी

औरंगाबाद - ‘क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे...’ कुसुमाग्रजांच्या या ओळी श्रावण महिना सरता सरता अंशतःच खऱ्या ठरत केवळ उन्हाचे साम्राज्य राहिले. श्रावण महिन्याच्या शेवटी शहरावर पाऊस रिमझिम बरसला. रविवारी (ता. २०) दिवसभर झालेल्या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ३४.६ मिमी, तर दोन दिवसांच्या पावसाची एकूण ७६ मिमी एवढी नोंद झाली.

गेल्या जवळपास पन्नास दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मोठ्या विश्रांतीनंतर पावसाने शनिवारी शहरात हजेरी लावली. हवामान खात्याने शनिवारी अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना ‘अंदाज मणभराचा, पाऊस पडला कणभराचा’ अशी परिस्थिती राहिली होती. पण दुसऱ्या दिवशी रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. एरवी श्रावण महिन्यात हिरवेगार होणारे शिवार यंदा पावसाने दडी दिल्याने करपले. ग्रामीण भागात रोजगाराची संधी धूसर होत असल्याचा अंदाज घेत येथील कुटुंबांनी स्थलांतराची तयारी चालवली होती. पण श्रावण महिना सरता सरता परिस्थिती बदलली आणि शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.

शनिवारी सायंकाळी अवघ्या १२.६ मिमी पडलेल्या पावसाने उत्तररात्री आणि रविवारी जोर धरला. त्यामुळे शनिवारी ते रविवारी सकाळी अकरापर्यंत ४१.१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. दिवसभरही पाऊस कधी रिमझिम तर कधी जोराने पडला. रात्री साडेसातपर्यंत चिकलठाणा वेधशाळेत दोन दिवसाच्या पावसाची ७६ मिमी इतकी नोंद झाली. आगामी आठवड्यातही पावसाचा जोर राहणार असून कमाल तापमान २५ ते २९, तर किमान तापमान १९ ते २० अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहरात सरासरी ३२.४० मिमी पाऊस 
शनिवारपासून झालेल्या पावसाने शहराला चांगलेच भिजवले. शहरात सरासरी ३२.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस सिल्लोड तालुक्‍यात झाला असून त्याची सरासरी ६१.८८ मिलिमीटर इतकी नोंदवण्यात आली. त्याखालोखाल फुलंब्री ४५.५०, पैठण ४३.१०, सोयगाव ३१.०० आणि वैजापूर १७.३० मिलिमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद महसूल विभागातर्फे करण्यात आली.

शहरवासीयांचा ‘लेझी संडे’
शनिवार आणि रविवार हे सुटीचे असल्याने शहरवासीयांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बाहेर पावसाची झड आणि सुटीचा दिवस असल्याने नागरिकांनी लेझी संडे साजरा केला. शहरातील रस्त्यांवर रविवारी शुकशुकाट होता. पावसाचा आनंद घेणाऱ्यांनी मात्र घरी न थांबता शहराबाहेर जाऊन पर्यटनस्थळे गाठली आणि निसर्गाचा आनंद घेतला. शहरालगतचे म्हैसमाळ, दौलताबाद, सातारा, वेरूळ आदी ठिकाणे गर्दीने फुलून गेली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com