पावसाची महापालिकेला धास्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - दोन आठवड्यांपासून शहरात धो-धो कोसळणाऱ्या पावसाची महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. थोडा मोठा पाऊस झाला की, अग्निशमन विभागासह अधिकाऱ्यांचे फोन खणखणत आहेत. त्यामुळे चोवीस तास सतर्क राहावे लागत असल्याने केव्हा संपतो पावसाळा असे उद्‌गार अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.

औरंगाबाद - दोन आठवड्यांपासून शहरात धो-धो कोसळणाऱ्या पावसाची महापालिका प्रशासनाने धास्ती घेतली आहे. थोडा मोठा पाऊस झाला की, अग्निशमन विभागासह अधिकाऱ्यांचे फोन खणखणत आहेत. त्यामुळे चोवीस तास सतर्क राहावे लागत असल्याने केव्हा संपतो पावसाळा असे उद्‌गार अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.

शहरात दोन आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडत आहे. तास-दोन तास पाऊस झाला की, शेकडो घरात पाणी घुसत असून, रस्त्यांवर तळे साचत असल्याने वाहने अडकून पडत आहेत. भीतीने नागरिक अग्निशमन विभागासह महापालिका अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. त्यानंतर प्रशासनाला मदतीसाठी धावपळ करावी लागत असून, जयभवानीनगर, नूर कॉलनीसह इतर ठिकाणी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे पावसाची महापालिका प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे. केव्हा एकदाचा संपतो पावसाळा अशा प्रतिक्रिया अधिकारी व्यक्त करत आहेत. गुरुवारीसुद्धा (ता. २१) महापालिकेकडे पावसाचे पाणी घरात घुसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले, ‘‘पाऊस सुरू झाला की महापालिका अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून दिल्या जात आहेत. तक्रारी प्राप्त होताच मदतीसाठी सूचनादेखील केल्या जात आहेत.’’

आपत्कालीन व्यवस्थेचा विसर 
दोन आठवड्यांपासून होणाऱ्या पावसामुळे महापालिकेला आपत्कालीन व्यवस्थेची आठवण झाली आहे. इतर महापालिकांमध्ये वॉर्ड कार्यालयामार्फत पावसाळ्यात नागरिकांना मदत केली जाते; मात्र औरंगाबादमध्ये वॉर्ड कार्यालयांकडे अद्ययावत सुविधा नाहीत. त्यामुळे महापालिकेची भिस्त अग्निशमन विभागावरच अवलंबून आहे. स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत शहरातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

दुसऱ्या दिवशीही शेकडो घरांत पाणीच पाणी
पावसाचे धुमशान सुरूच आहे. गुरुवारी (ता. २१) शहरासह परिसरातील शेकडो घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने घरे, अंडरग्राउंड दुकानांमध्ये घुसलेले पाणी काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले असून, रात्री उशिरापर्यंत मदतीची मोहीम सुरूच होती. शहरात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने नाल्यांना पूर आला तर रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. या पावसात सिडको बसस्थानकाशेजारी असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या अंडरग्राउंडमध्ये असलेल्या कार्यालयात पावसाचे पाणी घुसल्याने खळबळ उडाली. बॅंक अधिकाऱ्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर पाणी उपसण्याचे काम सुरू झाले. संत एकनाथ रंगमंदिराशेजारी असलेल्या एका रुग्णालयाच्या इमारतीमध्येही पावसाचे पाणी शिरले. जवाहर कॉलनी परिसरातील वसंतनगर भागात काही घरामध्ये पाणी आल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला मदतीसाठी पाचारण केले. बेगमपुरा भागातील आनंदनगर, जटवाडा रोडवर असलेल्या सईदा कॉलनी परिसरातील काही घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले होते. उस्मानपुरा भागातील हरिनाम प्लाझा या इमारतीतील अंडरग्राउंड दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरूच होते.

Web Title: aurangabad marathwada news rain municipal pressure