शेतीची माती, पिकांचा पाचोळा

शेतीची माती, पिकांचा पाचोळा

औरंगाबाद - यंदा सर्वत्र ‘फिल गुड’ असल्याचे हवामान विभागाचे अंदाज जाहीर होत असताना जूनमध्येच पावसाने जोरदार सलामी दिली.

शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी शेतं गाठली आणि मोठ्या उत्साहात पेरणी केली. पेरलेले चांगले उगवले. निंदणी, कोळपणीला जाऊ, असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. पावसाने ओढ दिली. ढगाळ वातावरणही हरपले. कडक ऊन पडू लागले. ओलावा नष्ट झाला. शेतीची माती झाली. करपल्याने पिकांचा पाचोळा झाला. भेगाळलेल्या भुईमुळे शेतकऱ्यांचं जिणंही भेगाळलं. दुष्काळाचे दुष्टचक्र यंदाही मराठवाड्याच्या माथी बसण्याची भीती पुन्हा एकदा खरी ठरली.

मराठवाड्यात जूनच्या सलामीला कधी पाऊस होत नाही. यंदा मात्र उलट चित्र होते. पहिल्या आठवड्यात जोरदार सलामी दिली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढे सारे सुखकारक होईल, असे गृहीत धरून जोमाने पेरणी केली. अर्थात हा पाऊसही सर्वदूर नव्हता. त्यामुळे अनेकांच्या पेरण्या बाकीच होत्या. पुढे कधी तरी झालेल्या रिमझिम पावसावर त्याही आटोपल्या. पावसाच्या खंडानंतर दुबार पेरणीची भीती व्यक्त होऊ लागली. पुन्हा रिमझिम झाली आणि ती काही अंशी टळली. बऱ्याच क्षेत्रात खरीप जोमात असताना पावसाने दीर्घकाळ पाठ फिरविली. किरकोळ अपवाद वगळता जुलै कोरडाच गेला. ऑगस्ट निम्मा झाला तरी कुठेही समाधानकारक सर पडलेली नाही. विशेष म्हणजे मॉन्सून सक्रिय झाल्याच्या पाऊलखुणाच या भागात दिसल्या नाहीत. श्रावणाच्या खुणा तरी साऱ्या मराठवाड्याच कुठेच दिसत नाहीत. उलट जमिनीतील ओलावा नष्ट झाला. शेती भेगाळली. पिके वाळून जात आहेत. अनेकांची पिकांवर नांगर फिरवायला सुरवात होत आहे. वाळलेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागण्या जोर धरीत आहेत. त्यासाठी आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. 

संप, आंदोलने अन्‌ रांगा
शेतमालाला योग्य भावासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेला. हा संप गाजला. त्यातच कर्जमाफीवरून विरोधक आंदोलनांच्या माध्यमातून रान उठवीत होते. अखेर कर्जमाफीचा निर्णय झाला; पण अंमलबजावणी ‘ऑनलाइन’मध्ये उभी आहे. त्यामुळे किती शेतकऱ्यांना किती लाभ होईल, किती जण कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होतील, याबाबत अजूनही अनभिज्ञताच आहे. आज होईल, उद्या होईल असे म्हणत शेतकरी वाटचाल करीत असताना पंतप्रधान पीकविम्याची लाट आली. नोटाबंदीवेळी जशा बॅंका, एटीएमपुढे रांगा लागल्या तशा शेतकऱ्यांना लावाव्या लागल्या. ‘ऑनलाइन’, ‘ऑफलाइन’मध्ये त्यांचे अतोनात हाल झाले. रात्रीचा दिवस करून परिणाम काय, तर अनेक शेतकरी पीकविम्याच्या संरक्षणापासून दुरावले. या साऱ्या घडामोडी सुरू असताना ‘घार हिंडे आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी’प्रमाणे बळिराजाची पाऊले आणि नजर शेताकडे होती. सुरवातीच्या पावसाने डोलणारे शेत मागच्या दुष्काळाचा बॅकलॉग भरून काढील, असेच त्यांना वाटत होते; पण पावसाच्या अवकृपेने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. 

भर श्रावणात पिकं उन्हात.. सोशल मीडियावरही चिंता
गेल्या दोन महिन्यांपासून मराठवाड्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे बळिराजा दुष्काळी संकटात सापडला आहे. दुष्काळाच्या या चर्चेने सोशल मीडियाही व्यापला आहे. सामान्यच नव्हे; तर प्रगतिशील शेतकरीही दुष्काळाबाबतचे स्वतःच्या काळ्याभोर शिवाराचे, वाळलेल्या पिकांचे, भेगाळलेल्या जमिनीचे फोटो टाकून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्थात या प्रयत्नामागे केवळ अस्मानी व सुलतानी संकटाने शेतीची झालेली अवस्था शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे. एकीकडे सरकारने पीकविमा भरण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केला. दुसरीकडे पेरणी क्षेत्र, पावसाची प्रत्यक्ष स्थिती याविषयी सर्व माहिती उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना आधार देण्याची तसदी शासनाकडून घेतली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या मनातील या अवस्थेचे अस्वस्थ प्रतिबिंब सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न बळिराजाही करीत आहे.

अधिवेशनातला आवाज निर्णयाविना

मराठवाड्याच्या या दुष्काळी स्थितीवर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आवाज उठला, एवढी भीषण स्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली असली तरी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, एवढेच सांगून त्यांचे समाधान केले गेले आहे. आगामी काळात चांगल्या पावसाची प्रतीक्षा असली तरी दुबार पेरणी अशक्‍य आहे. चांगला पाऊस झाल्यास रब्बीवर आशा असतील, पाणीटंचाई टळेल; पण या साऱ्या बाबी निसर्गावर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने आतापासूनच ठोस उपाययोजनांसाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नदी-नाले प्रकल्प, बंधारे, तलाव कोरडेच
विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला
पिके लागली करपू
पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न होऊ लागला गंभीर 
गवत गेले करपून, कडबाही दुरापास्त 
जनावरांची रवानगी बाजारांकडे

पेरणीची स्थिती
औरंगाबाद व लातूर विभाग मिळून मराठवाड्यातील एकत्रित ४९ लाख १०९ हजार हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ४७ लाख १६२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. ९६.०४ टक्के प्रमाण आहे. 

धरणांत ठणठणाट...
जिल्हा    लघुप्रकल्पांची    उपयुक्‍त 
संख्या    पाणीसाठा

औरंगाबाद    ९०    ०६ टक्‍के
जालना    ५७    ०५ टक्‍के
बीड    १२६    ०८ टक्‍के
परभणी    २२    ०७ टक्‍के
हिंगोली    २७    ०५ टक्‍के

केवळ ३२.७ टक्के पाऊस
औरंगाबाद     31.09 टक्के 
जालना     32.1 टक्के 
परभणी    24.09 
हिंगोली     32.05 
नांदेड    30.5 
बीड    36.3 
लातूर    36.6 
उस्मानाबाद    37.9 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com