सत्ताधारी रावण, तर सदाभाऊ हनुमान - राजू शेट्टीं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - 'सीतेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांना हनुमान म्हणून लंकेत पाठविले होते; मात्र सत्ताधारी "रावणा'च्या प्रभावामुळे ते वापस येऊ शकले नाहीत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

औरंगाबाद - 'सीतेचा शोध घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांना हनुमान म्हणून लंकेत पाठविले होते; मात्र सत्ताधारी "रावणा'च्या प्रभावामुळे ते वापस येऊ शकले नाहीत, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

औरंगाबादेत बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करणे हेच आपले उद्दिष्ट आहे. उत्पादनखर्चावर आधारित दीडपट हमीभाव, नुकसानभरपाई मिळावी यासाठी राज्यभर दौरे करीत आहेत.'' सध्या कुठल्या वादात पडण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणार असल्याची सावध भूमिकाही या वेळी त्यांनी मांडली. शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले मात्र जाणीवपूर्वक पैसे जमा केले नाहीत, शेतकऱ्यांची इत्थंभूत माहिती सरकारकडे आहे, मात्र राज्य सरकार केवळ वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

भ्रष्टाचार बाहेर काढू
मराठवाड्यातील सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले असून, विम्याचा परतावा मिळण्यासाठी पंचनामे करण्यास सरकार उदासीन आहे. स्वाभिमानी संघटनेने तुरीचा गैरव्यवहार उघडकीस आणला; तसेच उडीद, मुगाची अल्प दराने होणारी खरेदी व त्यात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोकळे आदी उपस्थित होते.

सरकारला गुडघे टेकायलाच लावणार
शेतमालाचा दर पडल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करते; मात्र सध्याच्या धोरणांचा दलालानांच फायदा होत आहे. मग ही धोरणे ठरविणारी मंडळी कोण? असा सवालही शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि स्वामिनाथन आयोगाप्रमाणे उत्पादनखर्चावर आधारित दीडपट हमीभाव द्यावा; अन्यथा केंद्र, राज्य सरकारला शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकायलाच लावू, असा इशाराही त्यांनी दिला.

जपून जा; राणेंना सल्ला
नारायण राणे यांच्या राजकीय हालचालींविषयी राजू शेट्टी यांना विचारले असता "जाताना जपून जा, सीतेचा शोध घ्यायच्या भानगडीत पडू नका,' असा सल्ला त्यांनी दिला. सदाभाऊ आणि शेट्टी यांच्यातील वादावर पडदा पडला का, असे विचारले असता ""ते कच्चे लिंबू आहेत आणि परिवर्तनाच्या चळवळीतून कच्चे लिंबू बाहेर पडतात,'' असे वक्तव्य त्यांनी केले. शेतकरी बोगस नाहीत, तर चंद्रकांत पाटीलच बोगस मंत्री आहेत, या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.