महापालिकेचा कारभार ‘अतिरिक्त’वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

एक उपायुक्त, तीन पदभार; अनुशेषामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील वाढला ताण

औरंगाबाद - महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त होत असून, त्या जागेवर काम करण्यास मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने प्रत्येक विभाग अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांवर सुरू असल्याचे चित्र सध्या आहे. उपायुक्तांची चार पदे असताना सध्या एकही उपायुक्त कार्यरत नाही. त्यामुळे तीन उपायुक्तपदाचा एका अधिकाऱ्याकडेच पदभार देण्यात आला आहे. अशीच गत लेखा, विद्युत, वॉर्ड कार्यालयांमध्ये आहे. त्यामुळे फायलींचा निपटारा करताना अधिकाऱ्यांना दमछाक करावी लागत आहे. 

औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, आजघडीला लोकसंख्या तेरा लाखांच्या घरात आहे. एकीकडे लोकसंख्या व शहराचा परिसर वाढत असताना नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या घटत आहे. महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून नोकरभरती बंद असून, दुसरीकडे गेल्या काही वर्षांत पाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाले आहेत; मात्र या जागेवर भरती करण्यात आलेली नाही. उपायुक्तांची चार पदे मंजूर आहेत; पण त्यातील एकाच पदावर अधिकारी आहे. तेही दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे सध्या उपअभियंता असलेल्या अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला आहे. तोही तीन विभागांच्या उपायुक्तांचा. करमूल्य निर्धारण अधिकारीपदही त्यांच्याकडेच आहे. कामगार, प्रकल्प अधिकारी, महिला बालकल्याण अधिकारी ही महत्त्वाची पदे अतिरिक्त कार्यभारावर सांभाळण्यात येत आहेत. क्रीडा अधिकारी या पदावर चक्क एका लिपिकाची वर्णी लावण्यात आली आहे. अतिक्रमण हटावचा कार्यभारही एका उपअभियंत्याकडेच आहे.

मालमत्ता अधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंत्यावर जबाबदारी सोपविली आहे. नगररचना विभागात दोन उपअभियंता वगळले, तर इतर सर्व पदे रिक्त आहेत. गुंठेवारी विभागाला कायमस्वरूपी उपअभियंता नाही. लेखा विभागाची देखील तीच गत आहे. मुख्य लेखाधिकारी आजारी सुटीवर आहेत.

लेखाधिकाऱ्यांकडे त्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आणखी एका लेखाधिकाऱ्याची वॉर्ड अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. या विभागातील लेखापाल पद रिक्त आहे. मुख्यालयात ही गत असताना वॉर्ड कार्यालयातदेखील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा आहे. केवळ दोन वॉर्ड अधिकारी नियमित आहेत. उर्वरित सात वॉर्ड अधिकारी कनिष्ठ दर्जाचे आहेत. वॉर्ड कार्यालयांमध्ये सात उपअभियंत्यांची पदे रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंत्यांवर कामाचा ताण आहे. शहरातील पन्नास हजार पथदिवे सांभाळणाऱ्या विद्युत विभागाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यावर आहे.

कंत्राटी कर्मचारी सांभाळताना त्रेधा
महापालिकेने आऊटसोर्सिंग करून कर्मचारी घेण्याचा सपाटा लावला आहे. अनेक विभागांत हे कर्मचारी रुजू झाले आहेत. मात्र संबंधित कंत्राटदार महापालिकेकडे कर्मचारी सोपवून मोकळा होत आहे. या नवख्या कर्मचाऱ्यांना काम शिकविताना अधिकाऱ्यांना अक्षरक्षः घाम गाळावा लागत आहे. आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी त्यात नवख्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे अधिकाऱ्यांना दमछाक करावी लागत आहे.