चिकलठाण्यात रिमोट निर्मितीचा कारखाना

औरंगाबाद - महावितरण व गुन्हेशाखेने बुधवारी घातलेल्या छाप्यात जप्त मीटर, रिमोट व साहित्य.
औरंगाबाद - महावितरण व गुन्हेशाखेने बुधवारी घातलेल्या छाप्यात जप्त मीटर, रिमोट व साहित्य.

औरंगाबाद - रिमोटच्या साहाय्याने रीडिंग बंद करून वीजचोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर चक्क महावितरणकडे असलेल्या सात प्रकारच्या मीटरसाठीच रिमोट तयार करण्यासाठी कारखाना व रिसर्च सेंटर चिकलठाण्यात सुरू केल्याचा प्रकार समोर आला. हे रिसर्च सेंटरच महावितरण व गुन्हे शाखेने उद्‌ध्वस्त केले. सुमारे २१ मीटर व सहा रिमोट जप्त करण्यात आले आहेत.  

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया व त्यांच्या पथकांनी धडकसत्र राबविल्यानंतर रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे प्रकार उघड झाले. या प्रकरणात महावितरणच्या तक्रारीनुसार पोलिस विभागाने सुमारे पंधरा जणांची चौकशी करून सहाजणांना अटक केली.

किशोर रमेश राईकवार (३६, हर्सूल) हा गत अनेक दिवसांपासून मीटर बंद करणारे रिमोट बनवीत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिस व महावितरणने संयुक्त कारवाई केली. बुधवारी (ता. २६) चिकलठाणा एमआयडीसी भागात कोहिनूर कंपनीच्या गोडाऊनमध्ये छापा घातला. त्यात सिंगल व तीन फेजचे २१ विद्युत मीटरसह सहा वेगवेगळ्या प्रकारचे रिमोट व तीन करंट ट्रान्सफॉर्मर जप्त करण्यात आले. हा माल एक लाख एकशे साठ रुपयांचा आहे. ही कारवाई महावितरणचे ओमप्रकाश बकोरिया, त्यांचे पथक, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत व त्यांच्या पथकाने केली. 

असा झाला रिमोट चोरीचा उलगडा
एका घरात महावितरणचे अधिकारी तपासणीसाठी गेल्यानंतर मीटर बंद व आकडे जागीच होते. पण, विद्युतप्रवाह सुरू होता, शंका आल्याने त्यांनी अन्य अधिकाऱ्याला ट्रान्सफॉर्मरच बंद करून पुन्हा सुरू करण्याचे सांगितले. त्यानंतर मात्र मीटरचे आकडे पटापट सरकत होते. मीटरमधील गडबड लक्षात घेऊन त्यांनी शोधले असता रिमोटद्वारे चोरी झाल्याचे उघड झाले.   

मीटर कुणी दिले...
विविध प्रकारचे मीटर कारखान्यात आले कसे याबाबत कुतूहल असून, भंगारातून मीटर विकत घेतले असावे अथवा ग्राहकांनी मीटर विक्री केली असावी, मीटरच चोरी केले गेले का? किंवा महावितरणमधीलच काहींनी असे मीटर पुरवले असावेत का, याचा उलगडा झाला नसून पोलिसांनी जप्त केलेल्या मीटरबाबत खातरजमा करणार असल्याचे ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

सात प्रकारच्या वीज मीटरसाठी रिमोट निर्मिती
मीटरसाठी रिसर्च सेंटर
अभ्यास करून बनवायचे रिमोट
महावितरण, पोलिसांनी केले मीटर जप्त

मीटरवर रिसर्च 

महावितरण सात प्रकारचे मीटर ग्राहकांना पुरवते. या सातही प्रकारच्या मीटरवर संशोधन करून रीडिंग थांबवेल असे रिमोट कारखान्यात तयार केले जात होते. संयुक्त छाप्यावेळी कूलर कंपनीचे मालक अशपाक काझी (रा. कटकटगेट) हे बाहेरगावी गेल्यामुळे प्रशासनाला अधिक चौकशी करता आली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com