ऐतिहासिक स्मारकांच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची - फातेमा झकेरिया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपल्या शहराचे भूषण आहेत. त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री फातेमा झकेरिया यांनी शनिवारी (ता. १६) बिबी-का-मकबरा येथे केले. 

औरंगाबाद - ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके आपल्या शहराचे भूषण आहेत. त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री फातेमा झकेरिया यांनी शनिवारी (ता. १६) बिबी-का-मकबरा येथे केले. 

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळातर्फे १६ ते ३० सप्टेंबर स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याचे उद्‌घाटन शनिवारी (ता. १६) बिबी-का-मकबरा परिसरातील आईने महालात झाले. या कार्यक्रमाला मौलाना आझाद महाविद्यालयाच्या अध्यक्षा, पद्मश्री फातेमा झकेरिया, माजी संचालक डॉ. ए. जी. खान, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य एन. एस. वाठोरे, पुरातत्त्व अधीक्षक डॉ. दिलीप कुमार खमारी, उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी, मुख्य अभियंता आनंद तीर्थ, एन. सी. एच. पेडिंटलू यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. डॉ. खमारी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे उद्‌बोधन केले. आई आपल्या मुलांची काळजी घेते, त्याप्रमाणे आपण स्मारकांची जपणूक केली पाहिजे, या हेतूनेच या पंधरवड्याला ‘वात्सल्य-विरासत’ नाव देण्यात आल्याचे ते म्हणाले. विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती डॉ. वाजपेयी यांनी दिली. स्वच्छता पंधरवड्याबाबत त्यांनी माहिती दिली. ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांचीही भाषणे झाली. प्राचार्य वाठोरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती आवश्‍यक असल्याचे म्हटले. विद्यापीठाच्या रासेयोतील विद्यार्थ्यांच्या गटाने मकबरा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कालिका महिला बचत गटाच्या सदस्यांची या वेळी उपस्थिती होती. त्यांचा श्रीमती झकेरिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी एम. आर. शेख, विजय सातभाई, विलीश रामटेके, नीलेश सोनवणे, ए. के. तुरे, नीतू बित्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सहायक पुरातत्त्वज्ञ डॉ. किशोर चलवादी, रत्नेश कुमार यांनी सूत्रसंचालन केले.