दलालांना कोंडल्याप्रकरणी आरटीओ कार्यालयाची बनवाबनवी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी गुरुवारी (ता. दोन) आरटीओ कार्यालयात दलालांना कोंडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रत्यक्षात या प्रकरणात मात्र त्यांनी सपशेल माघार घेतली. पोलिसांकडे तक्रार तर केलीच नाही. मात्र, पत्रकार परिषदेतही त्यांनी त्या दलालांना पोलिसांनी समज दिली, असे सांगत या प्रश्‍नावर मौन बाळगणेच पसंत केले. पत्रकारांच्या प्रश्‍नावर उत्तर देण्याऐवजी त्यांनी वेळ मारून नेली. 

आरटीओ कार्यालयाला दलाली काही नवीन नाही. सर्वसामान्यांची कामे दलालांच्या आधाराशिवाय होत नाहीत. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या कार्यपद्धतीने काही प्रमाणात दलालांवर जरब निर्माण झाली होती. असे असले तरी गेल्या दिवसांत आरटीओ कार्यालयाला पुन्हा दलालांचा विळखा पडला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी पदभार घेतल्यापासून काही चांगले बदल करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणून त्यांनी गुरुवारी (ता. दोन) आरटीओ कार्यालयातील रिकाम्या कक्षात ठाण मांडलेल्या दलालांना कोंडून टाकले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दलालांना सोबत नेतानाच पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कुणालाही पाठवा, असा निरोप दिला होता. प्रत्यक्षात आरटीओंनी माघार घेत दलालांच्या विरोधात तक्रार दिलीच नाही. यामुळे पोलिस यंत्रणेचा नाहक वेळ वाया गेला.

आरटीओत दलाली मोडीत काढण्यासाठी आपण काम करतोच आहे. मी स्वत: कार्यालयात आलो, त्यावेळी कार्यालयाच्या कक्षात बेकायदेशीरपणे काही जण दिसल्याने त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना जबाब घेत, समज देऊन सोडून दिल्याने तक्रार देण्याची गरज पडली नाही. 
- सतीश सदामते,  प्रादेशिक परिवहन अधिकारी.

आरटीओंनी दिली नाही तक्रार 
आरटीओ कार्यालयात दलालांना पकडून ठेवल्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी जाऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणले. पहिल्या दिवशी कुणीही तक्रार देण्यासाठी आलेच नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी एक लिपिक पोलिस ठाण्यात आले. त्यांनीच आमची कुठलीही तक्रार नसल्याचे सांगितले. त्यानुसार आमच्या पोलिसांनी उपप्रादेशिक अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून खात्री केली. आरटीओंची तक्रार देण्याची इच्छा नसल्याने दलालांना सोडून देण्यात आले. जबाब घेण्याचा प्रश्‍नच आला नाही.