लोककलावंत, साहित्यिक रुस्तुम अचलखांब यांचे निधन

लोककलावंत, साहित्यिक रुस्तुम अचलखांब यांचे निधन

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. रुस्तुम रंभाजी अचलखांब (वय 73) यांचे मंगळवारी (ता. 24) रात्री हृदयविकाराने निधन झाले. डॉ. अचलखांब यांनी दलित नाट्य चळवळ आणि साहित्यात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्यावर बुधवारी (ता. 25) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. अचलखांब मूळचे जालना जिल्ह्यातील मानेगाव या छोट्याशा खेडेगावचे. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. प्रा. कमलाकर सोनटक्‍के यांच्या मार्गदर्शनाखाली 1973 मध्ये विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला. अचलखांब पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नाट्यशास्त्र विभागातच ते सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 2005 मध्ये ते नाट्यशास्त्र विभागप्रमुख झाले.

तमाशा लोककलेवर पीएचडी केली. डॉ. अचलखांब हे आधुनिक मराठी रंगभूमी आणि लोकरंगभूमीवरील एक प्रतिभाशाली गायक, नट, सिद्धहस्त लेखक, संशोधक, लोकसाहित्यिक, पाश्‍चिमात्य आणि पौर्वात्य रंगभूमीचे अभ्यासक, कुशल दिग्दर्शक आणि अस्सल लोककलावंत होते. त्यांनी त्यांच्या गोड लोकगायकीने रसिकांना भुरळ घातली होती. दहाव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

"भारतीय पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य रंगभूमी', "तमाशा : लोकरंगभूमी', "गावकी', "डॉ. आंबेडकरांचे ग्रंथलेखन : एक आकलन', "कैफियत', "अभिनयशास्त्र', "रंगबाजी', "गांधी, आंबेडकर आणि मी' व "पाच बुद्ध एकांकिका', "मराठी रंगभूमीचे प्रारंभपर्व' आणि प्रकाशनाच्या मार्गावर असलेले "लोकनायक श्रीकृष्ण' आदी वैविध्यपूर्ण साहित्यकृतींची त्यांनी निर्मिती केली आहे. "आंबेडकरी शाहिरीचे नवे रंग', "शिवरायांचा आठवावा प्रताप', "संगीत मनमोहना' हे त्यांचे लोककलांवर आधारित कार्यक्रमही खूपच गाजले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com