समृद्धी महामार्गावर इमर्जन्सी लॅण्डिंग स्ट्रीपची चाचपणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

तीन ठिकाणी सोय करण्याचा मानस; नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मदतीने काम
औरंगाबाद - नियोजित मुंबई-नागपूर या एक्‍स्प्रेस वेवर (समृद्धी महामार्ग) विमानांनाही इमर्जन्सी लॅण्डिंग करता यावे, या उद्देशाने नागरी उड्डाण मंत्रालयाकडून तीन ठिकाणी झोनच्या उभारणीसाठी जागेची चाचपणी सध्या सुरू आहे. ते कुठे तयार होऊ शकतात यावर आगामी महिन्यांत शिक्कामोर्तब होणार आहे.

हा महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा सर्वांत जवळचा मार्ग असेल. त्यावर विमानांची इमर्जन्सी लॅण्डिंगही करता यावी, यासाठी तीन झोन उभारणीचा समावेश या महामार्गाच्या कामात करण्यात आला आहे. पण, या लॅण्डिंग स्ट्रीप नक्की कुठे होणार आहेत यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या स्ट्रीपच्या उभारणीसाठी सध्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मदतीने चाचपणी करण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली. 

हे आहेत निकष...
या लॅण्डिंग झोनसाठी काही बाबी या महामार्गावर असणे आवश्‍यक आहे. यात पाच किलोमीटरचा सरळ रस्ता असावा आणि त्या ठिकाणी तात्पुरते एअर ट्रॅफिक कंट्रोल तयार करता यायला हवे. याशिवाय जिथे ही एअर स्ट्रीप असेल त्याभोवती मोठी झाडे, टेकडी आणि मोठी लोकवस्ती असता कामा नये, हे निकष आहेत. त्याअनुषंगाने अशा जागांचा शोध सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

रनवे देशाच्या फायद्याचाच 
सीमांच्या लगत आणि लांब असे प्रदेशात फरक करण्याचे दिवस आता नाहीत. दक्षिण भारतात अशा इमर्जन्सी लॅण्डिंग स्ट्रीप तयार करण्याचा विचार झालेला नाही. समृद्धी महामार्गावर असे स्ट्रीप तयार होणार असतील; तर त्यांचा फायदा देशाच्या संरक्षणात होईल. फायटर विमाने उतरवण्यासाठी चार किलोमीटर सरळ रस्ता आणि वजन पेलवणारा असणे ही प्राथमिक गरज आहे. युद्धप्रसंगात हा रनवे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. त्यासाठी चार किमीदरम्यानची वाहतूक कधीही रोखता येणे शक्‍य असल्याचे देशाच्या वायुदलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल (नि.) भूषण गोखले यांनी ‘सकाळ’ला सांगितले. यावर फार झाडे नसावीत आणि परिसरात मोठी बांधकामे असता कामा नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.