हत्तींपुढे माहुतांनी टेकविले हात

औरंगाबाद - हत्तींना ट्रकमध्ये चढविण्याचे प्रयत्न करताना माहूत.
औरंगाबाद - हत्तींना ट्रकमध्ये चढविण्याचे प्रयत्न करताना माहूत.

औरंगाबाद - महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालात गेल्या एकवीस वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सरस्वती व लक्ष्मी या हत्तींच्या जोडीला विशाखापट्टणम येथे पाठविण्यासाठीचे प्रयत्न शनिवारी (ता. नऊ) निष्फळ ठरले. तासाभराच्या अथक परिश्रमांनंतर सरस्वती वाहनात चढली; मात्र लक्ष्मीचा पाय निघत नव्हता. त्यामुळे रात्री आठ वाजता सरस्वतीलाही वाहनातून उतरविण्यात आले. आता रविवारी (ता. दहा) पुन्हा दोन्ही हत्तींना पाठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात प्राणिसंग्रहालय सुरू झाल्यानंतर १९९६ पासून हत्ती आकर्षणाचे केंद्र होते. कर्नाटक येथील सफारी पार्कमधून महापालिकेने शंकर आणि सरस्वती ही जोडी आणली होती. त्यानंतर १९९७ मध्ये लक्ष्मीचा जन्म झाला. दरम्यान, वृद्ध शंकरचा १९९८ मध्ये मृत्यू झाला. दरम्यान, हत्तींना मोकळ्या वातावरणात सोडण्याचा निर्णय नॅशनल झू ॲथॉरिटीने घेतला; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध व सरस्वतीचे झालेले वय यामुळे दोघी अद्याप उद्यानात पर्यटकांचे मनोरंजन करत होत्या. काही महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयात हत्तींना साखळदंडात बांधून ठेवल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच न्यायालयाने स्वतःहून या वृत्ताची दखल घेत याचिका दाखल करून घेतली होती. याप्रकरणी महापालिका व शासनाला म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले.

त्यानंतर हत्ती पाठविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. गेल्या आठवड्यात विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झूलॉजिकल पार्कच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून पुढील आठवड्यात नऊ डिसेंबरला हत्तींना नेण्यासाठी येत असल्याचे कळवले. त्यानुसार हे पथक शुक्रवारी (ता. आठ) रात्रीच शहरात दाखल झाले.  

सहा जणांचे पथक दाखल 
डॉ. नवीन कुमार, काळजीवाहक एम. के. रामकृष्णा यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पथक सिद्धार्थ उद्यानात शनिवारी (ता. नऊ) दाखल झाले. त्यानंतर महापालिकेने आवश्‍यक कागदपत्रांसह इतर तयारी सुरू केली. दोन मोठी वाहने, बांबू, साखळदंड, गुळाच्या भेली, काथ्या, प्रवासात हत्तींना पाणी पिण्यासाठी ड्रम हे साहित्य मागविण्यात आले. जेसीबी मागवून हत्तींना वाहनात चढविण्यासाठी मातीचा उंचवटा तयार करण्यात आला. दरम्यान, विशाखापट्टणमच्या माहुतांनी दोघींना ऊस, मक्‍याचा चारा खाऊ घालत त्यांना लळा लावण्याचा प्रयत्न केला. प्राणिसंग्रहालयाचे डॉ. ख्वाजा मोईनोद्दीन यांनी दोघींची वैद्यकीय तपासणी करून त्यांची तब्येत ठीक असल्याची खात्री केली. 

सरस्वती समजदार; लक्ष्मीने केले त्रस्त 
हत्तींच्या प्रवासासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजेपासून हत्तींना वाहनात चढविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ५४ वर्षे वय असलेली सरस्वती वाहनात चढली. तीनवेळा प्रयत्न फसल्यानंतर चौथ्या प्रयत्नात माहुतांना यश आले. त्यानंतर लक्ष्मीला वाहनात बसविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. लक्ष्मीला आधीच गुंगीचे औषध इंजेक्‍शनद्वारे देण्यात आले. तरीही ती वाहनात चढत नव्हती. आठ वाजेपर्यंत प्रयत्न केल्यानंतरही लक्ष्मी वाहनात बसत नसल्याने सर्वांनी हात टेकले. त्यानंतर वाहनात बसलेल्या सरस्वतीलादेखील उतरवून घेण्यात आले. आता रविवारी सकाळी दोघींना पाठविण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com