सातारा, देवळाईचे पाच कोटी केले कपात

सातारा, देवळाईचे पाच कोटी केले कपात

औरंगाबाद - सातारा, देवळाई परिसरातील विकास शुल्कापोटी मिळालेल्या १३ कोटींपैकी पाच कोटी रुपये सिडकोने महापालिकेला देण्यास नकार दिला आहे. झालर विकास आराखडा व सिडको नाट्यगृहाच्या कामांसाठी ही रक्कम वळती करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने महापालिकेला धक्का बसला असून, ही रक्‍कम मिळावी, यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेतला आहे. 

सातारा, देवळाई परिसराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने ‘सिडको’ची नियुक्ती केली होती. त्यानुसार या भागातील बांधकाम परवाने देण्याची जबाबदारीदेखील सिडकोवरच होती. दरम्यान, दीड वर्षापूर्वी सातारा-देवळाई नगरपालिका बरखास्त करून शासनाने हा भाग महापालिकेत समाविष्ट केला. सिडकोकडे या भागातील विकास शुल्कापोटी १३ कोटींची रक्कम जमा होती. त्यातील आठ कोटींचा निधी सिडकोने महापालिकेला दिला आहे. त्यानुसार या भागातील रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतले आहेत. उर्वरित पाच कोटी रुपये मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच सिडकोने पाच कोटींची रक्कम देण्यास नकार दिला आहे. ही रक्‍कम वळती करून घेण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. सिडकोने या भागासह झालर विकास आराखडा तयार केला आहे. त्यासाठी व सिडकोने बांधलेल्या नाट्यगृहापोटी निधी वळता करण्यात आल्याची माहिती देताच महापालिका अधिकाऱ्यांना धक्का बसला. ही बाब महापौर नंदकुमार घोडेले यांना माहीत होताच त्यांनी सिडकोचे प्रशासक ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या संदर्भात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले आहे, असे महापौरांनी सांगितले. 

रस्त्यासाठी वीस लाख 
महापौरांनी सोमवारी (ता. ११) या भागात रस्त्यांची पाहणी केली. त्याच चार वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधीच नसल्याचे समोर आले. त्यानुसार महापौरांच्या अधिकारात या रस्त्यासाठी २० लाख रुपये देण्याचे आश्‍वासन नागरिकांना महापौरांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com