चार कार्यकारी अभियंत्यांचा जनतेच्या पैशांवर डल्ला

चार कार्यकारी अभियंत्यांचा जनतेच्या पैशांवर डल्ला

लिंगदरी प्रकरण - तीन वर्षांत पंधरा बिले, सात धनादेश वटविले; ५९ लाखांचा अपहार 
औरंगाबाद - स्वत:चे सेव्हिंग अकाउंट असल्याप्रमाणे चार कार्यकारी अभियंत्यांनी वाटेल तेव्हा बिले काढून, लिंगदरी रस्त्याच्या (ता. औरंगाबाद) कामांचा निधी गडप केला. जेव्हा या कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले, तेव्हा घाईगडबडीने जेसीबी मशिनद्वारे कामे करण्यास सुरवात केली. स्फोटके लावून डोंगर फोडण्याचाही प्रयत्न केला गेला. हे करूनही हे प्रकरण लपून राहिले नाही. त्याची पोलखोल झाली. या चारही अभियंत्यांनी मनमानीपणे हा घोटाळा केला. 

एम. बी. मोरे (कार्यकारी अभियंता) - लिंगदरी रस्त्याचे काम न करताच पहिले बिल एम. बी. मोरे यांनी काढले. सम्राट मजूर सहकारी संस्थेच्या नावाने हे बिल काढण्यात आले. नोव्हेंबर २०१३ मध्ये धनादेश क्रमांक ३५०५७१ वरून १० लाख ९० हजार ३६० रुपये अदा करण्यात आले. याच महिन्यात दुसरे बिल अभय वीज तांत्रिक कामगार मजूर सहकारी संस्था लिमिटेड यांना देण्यात आले. यासाठी ३५०५७२ क्रमांकाचा धनादेश वटविण्यात आला. लिंगदरी रस्त्याच्या कामाचे तिसरे बिल हे ३१ मे २०१४ ला रवी मजूर सहकारी संस्था लिमिटेड यांना १०५५ बिल क्रमांकाचे ७ लाख ४ हजार १७४ रुपये अदा करण्यात आले. याचा धनादेश क्रमांक ३५३०५६ होता. उपअभियंता म्हणून के. टी. वाघ आणि शाखा अभियंता दिलीप चौधरी यांची त्या साइटवर पोस्टिंग होती. एम. बी. मोरे हे सध्या सेवानिवृत्त आहेत.

वृषाली गाडेकर (कार्यकारी अभियंता) - यांच्या काळातही भ्रष्टाचार झाला. काम पूर्ण झाल्यावर फायनल बिल काढण्याचे काम गाडेकर यांनी केले. मे २०१६ मध्ये तीन देयके काढण्यात आली. यांच्या सहीनिशी निघालेले पहिले बिल हे १ लाख ३० हजार ४१४ रुपयांचे होते. याचा धनादेश क्रमांक ९५७१५२ असा आहे. दुसरे फायनल बिल १ लाख ११ हजार १० रुपयांचे होते आणि तिसरे बिल ३९ हजार ८७२ रुपयांचे होते. अभय, संजय आणि रवी मजूर सहकारी संस्थांच्या नावाने ही बिले काढण्यात आली. या संस्थाही केवळ नावाला कागदावरच आहेत. या संस्थांचे ऑडिट झालेले नाही.

पी. ई. सुखदेवे (कार्यकारी अभियंता) - मुंबईहून बदली होऊन आलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. ई. सुखदेवे यांचा कमी कालावधीही चांगलाच गाजला. यांनीही लिंगदरीप्रकरणात मोठ्या प्रमाणावर बिले उचलली. नोव्हेंबर २०१५ मध्ये (कै.) अभिजित मजूर सहकारी संस्थेच्या नावाने १ लाख ८३ हजार ६६८ रुपयांचे बिल काढले. याचा धनादेश क्रमांक ३६२०५९ आहे. त्यानंतर याच महिन्यात २ लाख तीन हजार नव्वद रुपयांचे बिल काढले. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१६ ला मोठ्या रकमेचा धनादेश काढण्यात आला. संजय मजूर सहकारी संस्थेच्या नावाने असलेल्या धनादेशावर ४ लाख ८२ हजार ४३४ रुपये काढले. याचा धनादेश क्रमांक ३६२१५८ आहे. ही बिले काढताना जुनी थकीत बिले म्हणून काढण्यात आली आहेत. ही कामे प्रत्यक्षात झालीत की नाही, याची तपासणीसुद्धा करण्यात आली नाही. नोव्हेंबर २०१५ आणि फेब्रुवारी २०१६ या महिन्यात अभिजित मजूर सहकारी संस्थेच्या नावे सुखदेवे यांनी २ लाख ३ हजार ८६८ आणि ५ लाख ५२ हजार ७८० रुपयांची बिले काढली आहेत.
 

के. आर. गाडेकरांनी दिली ७ लाखांची बिले 
 मार्च २०१५ ला ज्या वेळी मार्च एण्डची घाई सुरू असते, तेव्हा पैसा खर्च केलेला दाखवावा लागतो. शिल्लक असलेला लिंगदरीचा पैसा सम्राट आणि अभय वीज तांत्रिक कामगार मजूर सहकारी संस्थेला देण्यात आला. सम्राट मजूर सहकारी संस्थेला ३६५६५० क्रमांकाच्या धनादेशाद्वारे ३ लाख ५९ हजार ३७८ रुपयांचा धनादेश दिला. दुसरे बिल हे ३ लाख ५५ हजार २३८ रुपयांचे देण्यात आले. दोन्हीही संस्थांना हे फायनल बिल देण्यात आले. फायनल बिल देताना सर्व कामे तपासून घेतली जातात. परंतु, कामे केलीच नाहीत. चार भिंतींआडच ही बिले उचलण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com