औरंगाबादेत ‘स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ला केंद्राची मंजुरी - मुख्यमंत्री

औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उद्‌घाटनप्रसंगी शुक्रवारी दीपप्रज्वलन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया के. ताहिलरमानी. न्यायमूर्ती आर. एम. बोर
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उद्‌घाटनप्रसंगी शुक्रवारी दीपप्रज्वलन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. डावीकडून कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया के. ताहिलरमानी. न्यायमूर्ती आर. एम. बोर

औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे औपचारिक उद्‌घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमानी, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला, सहायक महान्यायाधिकर्ता संजीव देशपांडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विद्यापीठाचे कुलगुरू एस. सूर्यप्रकाश आदी उपस्थित होते. 

जिथे ज्ञानाची निर्मिती होते, ज्ञानाचा एकसंध पूल बांधला जातो, जिथे ज्ञानाची अविरत प्रक्रिया चालते ते ठिकाण म्हणजे विद्यापीठ. दुर्दैवाने आपली पारंपरिक विद्यापीठे ज्ञाननिर्मिती प्रक्रियेत अपयशी ठरली आहेत. जागतिकीकरणाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारे, सायबर गुन्ह्यांना तोंड देणारे शिक्षण आणि तसे विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार शैक्षणिक संस्थांना जास्तीत जास्त स्वायत्तता देत असल्याचे सांगून तीन विधी विद्यापीठे असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

समाजाचे लढवय्ये व्हा
विधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक कौशल्ये आत्मसात करावीत. विद्यापीठातून घडणाऱ्या वकिलांनी नागरी समाजाचे लढवय्ये बनावे. माणुसकी समोर ठेवून करिअर घडवावे, असा सल्ला न्यायमूर्ती ताहिलरामनी यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यापीठात प्रत्यक्ष शिक्षण घेत असताना ज्ञानाची देवाण-घेवाण होते. सध्या ऑनलाइनच्या माध्यमातून कायद्याचे शिक्षण मिळत असले, तरी विद्यापीठाप्रमाणे ज्ञानाची देवाण-घेवाण या माध्यमात होत नाही, असेही त्या म्हणाल्या. 

विधी विद्यापीठ हे शिक्षण क्षेत्राच्या विकासातील मैलाचे दगड ठरणार आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून कायदेविषयक सेवा सामान्यांना पुरविल्या जाव्यात, विद्यापीठातून घडणारा विद्यार्थी हा सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता ठरावा, अशी अपेक्षा न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे यांनी व्यक्त केली. 

विसंगती का?
सामान्य माणसाला न्यायालयाने शिक्षा सुनाविल्यानंतर पोलिस लगेचच पुढील कारवाई करतात. सरकारी कर्मचाऱ्याला शिक्षा झाल्यास मात्र पोलिसांकडून दोन दोन वर्षे कारवाई होत नाही. ही विसंगती का, असा सवाल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केला. आपल्या मनात हे शल्य खूप दिवसांपासून सलत होते. ते व्यक्त करण्याची संधी आज मिळाल्याचे ते म्हणाले. ‘इंडिया’चे नव्हे, तर ‘भारता’चे वकील व्हा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार  
अभ्यागत प्राध्यापक म्हणून आपणास कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमंत्रित केल्याबद्दल ‘थॅक्‍यू फॉर इनव्हायटिंग मी ॲज अ व्हिजिटिंग प्रोफेसर’ अशी शब्दांत मुख्यमंत्रांनी आभार मानले.

कार्यक्रमास आजी-माजी न्यायमूर्ती, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अधिकारी, वकील, कायद्याचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. आर. सी. कृष्णैय यांनी आभार मानले.

‘प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्यसेवा’
लासूर स्टेशन (ता. गंगापूर) - ‘‘राज्यातील प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्यसेवा दिली जावी, या संकल्पनेतून शिबिरांची आखणी करण्यात आली आहे. रुग्णांची सेवा करण्यात खरा आनंद आहे. कुठलाही आजार असो; एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासन पाठीशी राहील,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

येथे शनिवारी (ता. नऊ) झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. श्री. बागडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, शिबिराचे आयोजक आमदार प्रशांत बंब आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘‘राज्य शासन स्वच्छ भारत अभियान, घर तेथे स्वच्छतागृह अशा रोगराई दूर करणाऱ्या योजना राबवीत आहे. आजार होऊ नयेत याची काळजी शासन घेत आहे. कोणताही आजार असो; रुग्णांवर उपचारासाठी हवा तेवढा पैसा खर्च करू.’

श्री. महाजन म्हणाले, ‘‘यापूर्वी रुग्णांना उपचारासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. रुग्णांना ग्रामीण भागातही उपचार मिळावेत, या उद्देशाने अशा शिबिरांची गरज आहे. या शिबिराच्या माध्यमातून हा उद्देश प्रत्यक्षात उतरला आहे.’’ 

जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या पंधराशे डॉक्‍टरांनी नेत्ररोग, हृदयरोग, त्वचारोग, अस्थिरोग, दंतचिकित्सा आदींसह विविध आजारांच्या रुग्णांची मोफत तपासणी केली. मोफत औषधी देण्यात आली. तपासणी केलेल्या रुग्णांवर औरंगाबादला विविध ठिकाणी लहान शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. मोठ्या शस्त्रक्रियेसाठी स्टिकर देण्यात येणार आहेत. रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. शिबिरात उल्पोपाहासह चाचण्यांसाठीची यंत्रसामग्री होती. औषधांची दालने होती. अपंगांसाठी विशेष व्यवस्था होती. शिबिरात आलेल्या अनेक रुग्णांवर ते बरे होईपर्यंत उपचार करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आमदार बंब यांनी सांगितले.
आमदार विनायकराव मेटे, सावे, सिरसाट, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, वेरूळचे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, सरालाबेटाचे महंत रामगिरी महाराज आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com