'समृद्धी'च्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

औरंगाबाद - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या विरोधात आता सत्ताधारी शिवसेनाही रस्त्यावर उतरली आहे. बुधवारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, बाधित शेतकऱ्यांनी कृती समितीतर्फे माळीवाडा आणि केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

आंदोलनामुळे दोन्ही ठिकाणी काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. या वेळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले. समृद्धी मार्गात जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांनी औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर आता शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि औरंगाबाद अशा तीन तालुक्‍यांतील जमीन या मार्गात बाधित होत आहे.

तिसरा रस्ता कशासाठी?
समृद्धी महामार्ग दहा जिल्ह्यांतील 30 तालुके, 354 गावांतून जाणार आहे. या प्रकल्पासाठी 20 हजार 820 हेक्‍टर जमीन संपादित केली जाणार आहे. रस्त्यासाठी 12 हजार 300 जमीन हवी आहे. यामध्ये 24 नवनगरांसाठी वेगळी जमीन घेतली जात आहे. महामार्गासाठी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून, एवढा पैसा कुठून आणणार? मुंबईला जाण्यासाठी सध्या दोन महामार्ग असताना नवीन महामार्ग कशासाठी बांधला जात आहे, असे प्रश्‍न आंदोलनांनी उपस्थित केले.