कन्हैयाकुमारच्या व्याख्यानासाठी सिडको नाट्यगृहास मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या व्याख्यानासाठी महापालिका प्रशासनाने संत तुकाराम सिडको नाट्यगृहाची दिलेली परवानगी ऐनवेळी नाकारली होती, त्यामुळे संविधान बचाव युवा परिषदेतर्फे शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन करीत आयुक्तांना घेराव घालण्यात आला. एका कार्यकर्त्याने आयुक्तांच्या दालनातच आत्मदहनाचा इशारा दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर संत तुकाराम सिडको नाट्यगृह देण्यात येत असल्याचे पत्र प्रशासनातर्फे दुपारी दिले.

कन्हैयाकुमार याचे सोमवारी (ता. 7) शहरात व्याख्यान होणार आहे. यासाठी संघटनेने महापालिका प्रशासनाकडे पैसे भरून संत तुकाराम सिडको नाट्यगृह भाड्याने घेतले होते. मात्र, प्रशासनाने ऐनवेळी सिडकोऐवजी संत एकनाथ रंगमंदिर घेण्याची सूचना करणारे पत्र संघटनेला दिले. मात्र, या कार्यक्रमाची पत्रके सर्वत्र वाटप करण्यात आली असून, आम्ही आरक्षित केलेले नाट्यगृहच मिळावे, अशी मागणी करत संघटनेतर्फे गुरुवारी (ता. 3) महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करण्यात आले. रात्री 12 वाजता प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली यांनी उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करत सकाळी याबाबत पत्र देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले, त्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले होते.

सकाळी पत्र मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांनी दुपारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. आयुक्तांनी पुन्हा एकदा तुमच्या मागणीचा विचार करू, असे आश्‍वासन दिले, त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. सचिन शिंदे याने, 'मी सोबत रॉकेल आणले असून, आत्मदहन करतो,'' असा इशारा या वेळी दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर आयुक्तांनी संत तुकाराम नाट्यगृह देण्याचे तोंडी आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. दुपारनंतर या संदर्भात लेखी पत्रही देण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याचा आदेश
सचिन शिंदे या कार्यकर्त्याने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त मुगळीकर संतप्त झाले. त्यांनी माझ्या दालनात येऊन मलाच धमकी देता काय, असा जाब विचारत संबंधित तरुणाला ताब्यात घेण्याच्या सूचना सुरक्षा विभागाला दिल्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला.

औरंगाबाद - विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या व्याख्यानासाठी संत तुकाराम सिडको नाट्यगृहच देण्यात यावे, या मागणीसाठी संविधान बचाव युवा परिषदेतर्फे महापालिका आयुक्तांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला.