चीनच्या धर्तीवर शहरात स्मार्ट रस्ता

चीनच्या धर्तीवर शहरात स्मार्ट रस्ता

औरंगाबाद - चीन शहरातील स्वच्छता, रस्ते, पर्यटन, घनकचरा व्यवस्थापन पाहून महापालिकेचे पदाधिकारी भारावले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात चीनच्या धर्तीवर स्मार्ट रस्ता करण्यात येईल, असा मनोदय पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. कचऱ्यापासून विटा तयार करण्याचा प्रकल्प, सफारी पार्कमध्ये पांडा, वेरूळ महोत्सवासाठी चीनच्या कलाकारांना निमंत्रण देण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

महापालिका आयुक्तांसह पाच पदाधिकाऱ्यांनी नुकताच चीनच्या चेंगडू (औरंगाबादची सिस्टर सिटी), ड्युहॅंग (मुंबईची सिस्टर सिटी) या शहरांचा दौरा केला. या दौऱ्याची मंगळवारी (ता. १८) माहिती देताना आयुक्त डी. एम. मुगळीकर, महापौर भगवान घडामोडे, गटनेते प्रमोद राठोड, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ म्हणाले, ‘‘ब्रिक्‍स देशांच्या परिषदेअंतर्गत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चेंगडू या एक कोटी साठ लाख लोकसंख्या असलेल्या, तसेच दोन लाख लोकसंख्या असलेल्या ड्युहॅंग या शहराची पाहणी केली. तेथील रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा होणारा वापर, प्रदूषण नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पर्यटन वाखनन्याजोगे असून, या दौऱ्याचा शहराला चांगला फायदा होईल. चेंगडू या शहरात रस्त्यांच्या बाजूला सायकल ट्रॅक आहेत. सुंदर दुभाजक, दिशादर्शक फलक, पथदिव्यांची व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत चीन शहरातील रस्त्यांच्या धर्तीवर एक रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून विकसित करण्याचा आपला मनोदय राहील’’, अशी माहिती आयुक्त श्री. मुगळीकर यांनी दिली. तसेच ड्युहॅंग शहरातील लेणी, चेंगडू शहरातील म्युझियम, शाळा, वाळूच्या टेकड्याची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. 
कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची चाचपणी चेंगडू शहरात सुमारे दोन हजार टन कचरा जमा होतो. जमा झालेला कचऱ्याची राख करून त्यापासून विटा तयार करण्याचा प्रकल्प एखाद्या आयटी कंपनीप्रमाणे चालविला जातो. या प्रकल्पाचा खर्च, व्यवस्थापनाबाबत माहिती घेण्यात आली. औरंगाबाद महापालिकेला शासनाने घनकचरा व प्रक्रिया करण्यासाठी वेळोवेळी सूचना केल्या आहेत. शहरात रोज सरासरी साडेचारशे टन कचरा निघतो. स्मार्ट सिटीमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध निधी व या प्रकल्पाला येणारा खर्च याची माहिती घेऊन शहरातसुद्धा असा प्रकल्प उभारता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. 

सफारी पार्कमध्ये पांडा 
चीनमधील पांडा सफारी पार्कचीही माहिती घेण्यात आली. या ठिकाणी ८३ पांडा असून, पार्कमध्ये सर्वत्र बांबूचे वन तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने मिटमिटा भागात सुमारे तीनशे एकरांवर सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पांडा मिळेल का, याची विचारणा करण्यात आली असता, तसा प्रस्ताव द्या, अशी सूचना चिनी अधिकाऱ्यांनी केली. 

सोलार पार्कमध्ये ८०० मेगावॉटची निर्मिती
ड्युहॅंग शहरातील सोलार पार्कमध्ये तब्बल ८०० मेगावॉट विजेची निर्मिती केली जाते. त्यातून या शहरासाठी असलेल्या निम्म्या विजेची गरज भागते. ५० बाय ५० किलोमीटरचे हे सोलारपार्क असून, या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास पाच हजार मेगावॉट विजेची निर्मिती होणार आहे. औरंगाबाद शहराची सोलार सिटी प्रकल्पाअंतर्गत निवड झाली असून, आपल्या शहरातही विजेच्या निमिर्तीसाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर थर्मलपार्कमध्ये दहा मेगावॉट विजेची निर्मिती केली जाते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते फेरोज खान, नगरसेवक कचरू घोडके, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

म्हणे आत्मे बोलतात...
ड्युहॅंग शहरातील वाळूच्या टेकड्याविषयी माहिती देताना आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी तेथे आत्मे बोलतात अशी आख्यायिका सांगितली. येथे क्विंगशी पर्वत होता, पायथ्याशी तळे, गाव, मंदिरे होती. तेथे प्रार्थनेसाठी लोक येत. जवळच्या वाळवंटात राहणारा ड्रॅगन प्रिन्स हा दुष्ट होता. प्रार्थनेच्या आवाजामुळे त्याने जादूने वाळूची टेकडी हलवून गाव बुजविले. येथील वाळूमधून जो आवाज येतो तो या आत्म्यांचा असतो, अशी आख्यायिका प्रचलित असल्याचे श्री. मुगळीकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com