सणासुदीसाठी विशेष रेल्वे सुरू करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - दिवाळी, दसऱ्याच्या काळात जोधपूर-बिकानेरसाठी गाडी सुरू करावी, कोलकाता येथे होणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी संत्रागच्छी एक्‍स्प्रेस गाडीचा विस्तार करून ती गाडी औरंगाबाद मार्गे करावी आणि शहरातील संग्रामनगर रेल्वेगेट सुरू करावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने निवेदनाद्वारे रेल्वे प्रवासी सेवा समितीकडे केली.

निवेदनात म्हटले आहे, की संग्रामनगर रेल्वेगेट गेल्या काही दिवसांपासून बंद केल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विभागीय आयुक्तांनी भुयारी मार्गासाठी चार महिन्यांत निधी देण्याची हमी दिली. हा निधी मिळेपर्यंत आणि काम सुरू होईपर्यंत हा मार्ग सुरू करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. त्यावर समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, श्रीराम गोर्डे, डॉ. प्रेम खडकीकर, शिवदास वाडेकर, रामदास जिनवाल यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत. मात्र, समितीने यावर काहीही आश्‍वासन दिले नाही. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडेच पाठपुरावा करा, असे सांगून टाळाटाळ केली. 

चाळीसगावमार्गे रेल्वे सुरू करा
नगरसेवक शिवाजी दांडगे अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर यांनी समितीची भेट घेऊन, कन्नड चाळीसगाव मार्गे रेल्वेमार्ग सुरू करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे शिर्डी संस्थान शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने रोटेगाव (वैजापूर)-कोपरगाव अशा ३५ किलोमीटरच्या मार्गाचे काम पूर्ण करावे, परभणी मनमाड मार्गाचे दुहेरीकरण करावे, चिकलठाणा येथे पिटालाइनचे काम करण्याची मागणीही त्यांनी केली.