पदव्युत्तरच्या रिक्त जागांसाठी आज होणार ‘स्पॉट ॲडमिशन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पहिल्या दोन्ही यादीत प्रवेश न मिळालेल्या तसेच ‘सीईटी’ न दिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेवर ‘स्पॉट ॲडमिशन’मध्ये गुरुवारी (ता. २४) प्रवेश मिळणार आहे.

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील पहिल्या दोन्ही यादीत प्रवेश न मिळालेल्या तसेच ‘सीईटी’ न दिलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेवर ‘स्पॉट ॲडमिशन’मध्ये गुरुवारी (ता. २४) प्रवेश मिळणार आहे.

पहिल्या यादीत प्रवेश ‘फ्रीज’ केलेल्या आणि दुसऱ्या यादीत प्रवेश ‘फ्रीज’ व अलॉटमेंट पत्र भेटलेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २३ ऑगस्ट यादरम्यान सायंकाळी साडेपाचपर्यंत संबंधित विभागात तसेच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आले. पदव्युत्तर प्रवेशासाठी गुरुवारी ‘स्पॉट ॲडमिशन’साठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठ परिसर औरंगाबाद येथील संबंधित विभागात विहित नमुन्यात सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत विद्यापीठात येऊन अर्ज जमा करणे आवश्‍यक राहील. प्रवेशपूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची आवश्‍यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी तीनशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये शुल्क संबंधित विभागात भरणे अनिवार्य आहे. 

दुपारी दोन ते चार यावेळेत आलेल्या अर्जातून संवर्गनिहाय व गुणवत्तानिहाय यादी तयार करण्यात येऊन संबंधित विभागाच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात येईल. सायंकाळी चारपासून समुपदेशनाद्वारे स्पॉट ॲडमिशन व ॲलॉटमेंटला सुरवात होईल. जे विषय विद्यापीठ विभाग परिसरामध्ये नाहीत अशा विषयांच्या स्पॉट ॲडमिशनसाठी विद्यापीठाच्या युनिक सेंटरमध्ये नोंदणी करावी व वरील प्रक्रिया तेथेच पूर्ण होईल. समुपदेशन व नंतर विद्यार्थ्यांना ॲलॉटमेंट लेटर ताबडतोब देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी संबंधित विभाग, महाविद्यालयात २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचपर्यंत प्रवेश निश्‍चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. वाल्मीक सरवदे यांनी केले. दरम्यान, विद्यापीठ वर्धापन कार्यक्रम संपल्यानंतर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विविध विभागांना भेट दिली. संबंधित विभागप्रमुख व प्राध्यापकांशी चर्चा केली. गुरुवारच्या स्पॉट ॲडमिशनसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.