एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या 17 ऑक्‍टोबरपासून मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना व महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) या प्रमुख संघटनांनी संपाची हाक दिली आहे. यासंबंधी शुक्रवारी (ता. 29) अधिकृत नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना अन्य कुठल्याही महामंडळापेक्षा तोकडे वेतन आहे. अपुरा पगार आणि प्रचंड वाढती महागाई, कौटुंबिक अडचणीला तोंड देताना कर्मचारी मेटाकुटीला आला आहे. म्हणूनच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोगाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले पाहिजे ही भूमिका आहे. महामंडळाने वेतन करार करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कर्मचारी वेतन कराराऐवजी वेतन आयोगाप्रमाणे लाभ मिळावे, या मागणीवर ठाम आहेत. यासाठी महामंडळाच्या संमतीने 26 व 27 मे रोजी लोकशाही पद्धतीने झालेल्या मतदानात, वेतन आयोग मिळावा या बाजूने 84 हजार 957 कर्मचाऱ्यांनी मतदान करून वेतन आयोगाला पाठिंबा दिल्याचे छाजेड यांनी सांगितले. 99 टक्के कर्मचारी वेतन आयोगावर ठाम असल्याने 16 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय झाला आहे.