विद्यार्थ्यांची रिक्षातील कोंबाकोंबी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

आरटीओ, पोलिसांची डोळेझाक, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

औरंगाबाद - शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसची आरटीओ कार्यालयाने तपासणी करून कारवाई केली; मात्र दुसरीकडे रिक्षाच्या माध्यमातून शाळकरी मुलांची अक्षरश: रिक्षात कोंबून होणारी धोकादायक वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. या वाहतुकीकडे आरटीओ आणि पोलिसांनीही डोळेझाक केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  

आरटीओ, पोलिसांची डोळेझाक, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

औरंगाबाद - शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या स्कूल बसची आरटीओ कार्यालयाने तपासणी करून कारवाई केली; मात्र दुसरीकडे रिक्षाच्या माध्यमातून शाळकरी मुलांची अक्षरश: रिक्षात कोंबून होणारी धोकादायक वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. या वाहतुकीकडे आरटीओ आणि पोलिसांनीही डोळेझाक केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  

शहरात महापालिकेच्या हद्दीत सर्व प्रकारच्या शाळांची संख्या ८४७ आहे. जिल्ह्यात चार हजार १९० शाळा आहेत. यामध्ये नऊ लाख ४७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात खासगी इंग्रजी शाळांचे पीक आलेले आहे. यात बहुतांश नामांकित शाळा या शहराबाहेर असून, बस, रिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक केली जाते. रिक्षा, छोट्या स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबले जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष अशी काळजी घेतली जात नाही. बहुतांश खासगी इंग्रजी शाळांमध्ये परिवहन समित्याही नाहीत.

शाळेच्या मुलांच्या एक हजार ९० स्कूल बसची आरटीओ कार्यालयाकडे नोंद आहे. परिवहन विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे स्कूल बसची मे व जून महिन्यांत फिटनेस तसापणी करण्यात आली. परिवहन विभागाने पाचशेपेक्षा अधिक स्कूल बसची तपासणी करून त्रुटीची पूर्तता करून घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील साठ ते सत्तर टक्के स्कूल बसची तपासणी झाली आहे. उर्वरित बसच्या विरोधात कारवाई करण्याचे परिवहन विभागाचे धोरण आहे. स्कूल बसची तपासणी केली जात असताना, दुसरीकडे मात्र शाळकरी मुलांच्या रिक्षा वाहतुकीकडे परिवहन विभाग आणि पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले आहे. रिक्षामध्ये पाठीमागच्या सीटवर सहाजण, त्याच्यासमोर लावलेल्या लाकडी पट्टीवर तीन-चारजण आणि चालकाच्या शेजारी दोघेजण अशी दहा ते बारा मुलांची वाहतूक केली जात आहे. 

शहराच्या प्रत्येक रस्त्यावर एका रिक्षामध्ये आठ ते दहा मुलांना कोंबून वाहतूक केल्याचे चित्र राजरोसपणे दिसत आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या काळात मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र आजपर्यंत अशा रिक्षांची तपासणी झाली नाही. आरटीओ आणि पोलिसही रिक्षातून मुलांच्या होणाऱ्या वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने संपूर्ण जिल्हाभरात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू झाला आहे.