तेरणा नदी यंदा जूनमध्येच वाहू लागली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

औरंगाबाद - औरंगाबादसह लातूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले वाहते झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे गेल्या सात वर्षांच्या कालखंडानंतर तेरणा नदी यंदा प्रथमच जूनमध्ये दुथडी भरून वाहत आहे. लातूर जिल्ह्यातील तावरजा नदीही वाहू लागली आहे.

गेल्या काही वर्षांनंतर यंदा प्रथमच पावसाने मृग नक्षत्रात दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यात कसबे तडवळे परिसरात दररोज रात्री जोरदार पाऊस होत आहे. लातूर जिल्ह्यात जूनच्या सुरवातीपासूनच दररोज कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे पेठ (ता. लातूर) येथे तावरजा नदीला पाणी आले आहे. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात या नदीला पाणी येण्याची बऱ्याच वर्षांनंतरची ही पहिलीच वेळ आहे. या भागातील ओढेही वाहू लागले आहेत. अनेक शेतांत पावसामुळे पाणीच पाणी साचले आहे. जिल्ह्यात एक ते 14 जून या कालावधीत सरासरी 71.75 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातही बुधवारी काही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.

तुळजापूर तालुक्‍यात मृग नक्षत्र चालू झाल्यापासून 27.8 टक्के पाऊस झाल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद शहरासह गंगापूर तालुक्‍यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. करंजगाव (ता. वैजापूर) येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतवस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या भागातील शेतजमिनी जलमय झाल्या आहेत. शहरातही आज सुमारे अडीच तास पाऊस बरसला.