आवक घटल्याने टोमॅटोने खाल्ला भाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

१०० ते १२० रुपये किलो दराने विक्री; अत्यल्प उत्पादनाचा परिणाम

औरंगाबाद - गेल्या वर्षी टोमॅटोला कमी दर मिळाल्याने यंदा लागवड अत्यल्प झाली. परिणामी, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये येथील बाजार समितीमध्ये आवक निम्यावर आली. त्यामुळे शहरात आणि जिल्ह्यात सध्या टोमॅटोटा भाव १०० ते १२० रुपये प्रति किलो झाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

१०० ते १२० रुपये किलो दराने विक्री; अत्यल्प उत्पादनाचा परिणाम

औरंगाबाद - गेल्या वर्षी टोमॅटोला कमी दर मिळाल्याने यंदा लागवड अत्यल्प झाली. परिणामी, जूनच्या तुलनेत जुलैमध्ये येथील बाजार समितीमध्ये आवक निम्यावर आली. त्यामुळे शहरात आणि जिल्ह्यात सध्या टोमॅटोटा भाव १०० ते १२० रुपये प्रति किलो झाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

गत नऊ महिन्यांपासून टोमॅटोला मातीमोल भाव होता. त्यामुळे परिसरात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी दुसरे पीक घेतले. एवढेच नाही, ज्यांनी टोमॅटोचे पीक घेतले होते त्यांच्या शेतातील पीक एप्रिल आणि मेच्या उन्हामुळे करपले. परिणामी, अत्यल्प लागवड आणि कमी उत्पन्न यामुळे सध्या टोमॅटोने भाव खाल्ला आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमित ८० ते ९० क्‍विंटल टोमॅटो येतो. ही आवक सध्या अर्ध्यावर आली आहे. चार दिवसांपासून केवळ ३८ ते ४० क्‍विंटलच आवक होत आहे.

परिणामी, नाशिक येथून टोमॅटोची आयात करावी लागत आहे. सध्या बाजार समितीमध्ये ८०० रुपये प्रतिक्‍वंटलाच्या ठोक भावाने विक्री होत आहेत; तर शहरात हातगाडीच्या माध्यातून टोमॅटोची विक्री करणारे १०० ते १२० रुपये किलोने विक्री करीत आहेत.  

ही आहेत टोमॅटो उत्पादक गावे
औरंगाबाद परिसरात वरुड काझी, करमाड, राजाराय टाकळी, कुबेर गेवराई, जयपूर, वडखा, वरझडी, पळशी, हिरापूर, कच्ची घाटी, सुतानपूर, गंगापूर, शेंद्रा या गावांत टोमॅटोची लागवड करण्यात येते.

परजिल्ह्यातील आवकही अल्प 
शहरात मागणीनुसार टोमॅटोची आवक नाही. यंदा राज्यभरातच टोमॅटोची कमी प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यामुळे नवीन टोमॅटो बाजारात दिसतच नाही. नाशिक वगळता इतर जिल्ह्यांतूनही शहरातही टोमॅटोची फारशी आवक नाही. पुढील महिन्यात गणपती, महालक्ष्मी असे उत्सव असल्याने टोमॅटोंना मोठी मागणी राहील, त्यामुळे काही दिवस तरी दर खाली येणार नाहीत अशी शक्‍यता काही व्यापाऱ्यांनी वर्तविली. 

आकडे बोलतात... 
वार    आवक    ठोक भाव 

शनिवार (ता. १५)    ३३ क्‍विंटल    ४ हजार ते ६ हजार ५०० रुपये 
रविवारी (ता. १६)    ४० क्‍विंटल    अडीच हजार ते ८ हजार रुपये 
सोमवार (ता. १७)    ६४ क्‍विंटल    ६ हजार ते ८ हजार ५०० रुपये  
मंगळवार (ता. १८)    ३७ क्‍विंटल    ५ ते ६ हजार ५०० रुपये 
 

मधल्या काळात ५ ते ६ रुपये असा अत्यल्प भाव होता. त्यामुळे अनेकांनी टोमॅटोचे पीक घेतले नाही. ज्यांनी घेतले त्यांच्या पिकाला उन्हाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षी टोमॅटोच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यामुळेच भाव वाढले आहेत. 
- इलियास बेग, शेतकरी, वरुड काझी