‘घाटी’तील वाहतुकीची करावी लागणार सर्जरी!

‘घाटी’तील वाहतुकीची करावी लागणार सर्जरी!

रुग्णवाहिकांनाही शोधावा लागतो मार्ग, रिक्षा अन्‌ हॉकर्सचा अड्डा, बेशिस्त वाहन पार्किंग, रुग्णांची कसरत

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) काही करता वाहनांना शिस्त लागत नसल्याने रुग्णांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. पोलिसांनी शिस्तीचा अल्टिमेटम देऊन महिना उलटला तरी परिस्थिती जैसे थे आहे. न्यायालयानेही घाटीत येणाऱ्या रुग्णवाहिकेचा मार्ग मोकळा असावा, असे निर्देश दिलेले असून वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे, हे विशेष.

मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या घाटीतील वाहतुकीला पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही शिस्त लागलेली नाही. गेल्या महिन्यात आठ ऑगस्ट रोजी बेगमपुरा पोलिस, वाहतूक पोलिस, सुरक्षा रक्षक म्हणून नेमलेल्या मेस्को आणि एमएसएफ, पार्किंग कंत्राटदार, घाटीच्या रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी यांनी पाहणी करून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आमचे काम नाही, या मानसिकतेतून प्रत्येकाने अंग काढल्याने घाटीतील बेशिस्त वाहतुकीची परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र बाह्यरुग्ण विभागासमोर सकाळी नऊ ते बारा यादरम्यान पाहायला मिळत आहे. यामुळे या वेळेत आलेल्या आपत्कालीन रुग्णवाहिकांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. शिवाय रिक्षांचे स्टॅन्ड बाह्यरुग्णालयासमोरच झाल्याचे रोजचेच चित्र आहे. पाच ऑगस्टला दिलेले स्टिकर वाहनांवर लावण्याच्या सूचनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. अधिष्ठातांनी दिलेल्या सूचनाही गांभीर्याने घेतल्या जात नसल्याने पार्किंगला शिस्त लावणार कोण? असा सवाल केला जात आहे.

अपघात आणि बाह्यरुग्ण परिसरातील दुचाकी पार्किंगमध्येच चारचाकी लावल्या जात आहेत. त्यामुळे गाड्या अस्ताव्यस्त लावलेल्या दिसतात. मेडिसीन विभागासमोरच्या पार्किंगमध्ये जुन्या एमआयसीयूकडे गाड्या पार्किंग केल्या जातात. तसेच पार्किंगचे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून महाविद्यालयाचे मुख्य गेट, अपघात विभागासमोर, नर्सिंग कॉलेजसमोर गाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे अनेकवेळा रुग्ण व नातेवाइकांना वाहनधारकांच्या अरेरावीलाही सामोरे जावे लागते. या परिसरातील गाड्या उचलण्याला कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा विरोध आहे. तर दुसरीकडे पार्किंगसाठी खेळाच्या मैदानाची जागा उपलब्ध करून देऊनही समस्या कायम असल्याने क्रीडाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष 
शवविच्छेदनगृहासमोर दोनच रुग्णवाहिका उभ्या कराव्यात, बाकी रुग्णवाहिका मुख्य पार्किंगमध्ये उभ्या करून गरजेनुसार समोर आणाव्यात. सीव्हीटीएस विभागासमोर असलेल्या डॉक्‍टरांच्या चारचाकी पार्किंगसाठी एक व्यक्तीची नेमणूक, एमआरआय विभागाच्या बाजूच्या पार्किंगमध्ये कर्मचाऱ्यांच्या पार्किंगला शिस्त लावण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या होत्या. या सूचनांचे पालन केले नाही तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असेही स्पष्ट केले होते. परंतु, अद्याप पोलिसांच्या कोणत्याही सूचनांचे पालन झाल्याचे दिसत नाही. नेमके हे काम करणार कोण याची जबाबदारी निश्‍चित नसल्याने सकाळच्या सत्रात गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते.

हॉकर्स आणि रिक्षा स्टँड 
दंत महाविद्यालय ते बाह्यरुग्ण विभाग या परिसरात हॉकर्स आणि रिक्षांच्या रांगा उभ्या असतात. त्यामुळे डेंटल हॉस्पिटल, अपंग पुनर्वसन विभाग, मानसिक आरोग्य विभाग, बाह्यरुग्ण विभागात जाणाऱ्या रुग्णांना जीव मुठीत धरून कसरत करत वाट शोधावी लागते. हॉकर्स आणि रिक्षामुक्त घाटी परिसर करण्यासाठी प्रशासन काय कारवाई करेल? याकडे लक्ष लागून आहे. काही कर्मचारी बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीच्या आतमध्ये दुचाकी लावतात. परंतु याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. हा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, याकडे वेळीच लक्ष देणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com