'नंदिग्राम'च्या डब्यात अनारक्षित प्रवाशांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

औरंगाबाद - नागपूर-मुंबई धावणाऱ्या नंदिग्राम एक्‍स्प्रेसमधील आरक्षण कोचमध्ये अनारक्षित प्रवाशांनी गर्दी केल्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांचा रविवारी (ता. 28) चांगलाच मनस्ताप झाला. या प्रवाशांच्या त्रासाला कंटाळलेल्या नांदेडच्या अजिज पठाण या प्रवाशाने थेट ट्विटरद्वारे याची तक्रार रेल्वे बोर्ड आणि दक्षिण मध्य रेल्वे नांदेडच्या डीआरएमकडे केली. त्यामुळे डीआरएमसह अन्य कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

पठाण नंदिग्राम एक्‍स्प्रेसने प्रवास करीत होते. तेव्हा कोच एस-10 मध्ये आरक्षण न केलेल्या प्रवाशांनी गर्दी केली होती. याचा इतर प्रवाशांना त्रास होत होता. एवढेच नाही, तर एल-57 आणि एल-60 या सीटजवळ मोबाईल चार्जिंगची सुविधा नसल्याचेही त्यांनी ट्विटरवरील तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल सिकंदराबाद डीआरएमने घेत याविषयी नांदेड डीआरएमला कारवाईचे आदेश दिले. नांदेडचे डीआरएम ए. के. सिन्हा यांनी तत्काळ याची दखल घेत नंदिग्राम एक्‍स्प्रेसमधील टीसींना कारवाईचे आदेश दिले.

दुर्लक्षामुळे वाढल्या तक्रारी
रेल्वेतील आरक्षण कोचमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टी.सी. आणि आरपीएफचे जवान रेल्वेत तैनात करण्यात आलेले असतात. मात्र याच अधिकाऱ्यांकडून नियमितपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांना थेट रेल्वे मंत्रालय आणि डीआरएमकडे तक्रारी कराव्या लागत आहेत. पाच महिन्यांपूर्वी एका आरपीएफ जवानाच्या कंबरेला लावलेले पिस्तूल चोरीला गेले आहे. त्यामुळे ज्यांना स्वत:ची सुरक्षा करता येत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
---------------------------------