औरंगाबाद शहरात पायी चालणे झाले धोक्‍याचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरातील सर्वच प्रमुख भागांतील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्याचा अधिकारच आता उरलेला नसल्याचे चित्र आहे. शनिवारी (ता. १६) चिकलठाण्याजवळ झालेल्या अपघाताने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

औरंगाबाद - शहरातील सर्वच प्रमुख भागांतील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्याचा अधिकारच आता उरलेला नसल्याचे चित्र आहे. शनिवारी (ता. १६) चिकलठाण्याजवळ झालेल्या अपघाताने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

शहरात कुठे अपघात झाला की ‘पादचारी मध्ये आला’, ‘सायकलस्वाराने मध्येच सायकल घातली’ अशी ठरलेली वाक्‍ये ऐकू येतात; पण फुटपाथवरील अतिक्रमणांमुळे अपघात वाढत आहेत, याकडे कुणी लक्ष देत नाही. पादचाऱ्याला रस्त्यालगत चालण्याची सोयच नसल्याने तो रस्त्याच्या कडेने किंवा रस्त्यावरून चालतो. मुळात रस्ता करताना पादचाऱ्यांचा विचारच केला जात नाही. त्यामुळे फुटपाथचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही. रस्ता करताना वाहने वाहणाऱ्या कॅरेज वेशिवाय कोणतेही बांधकाम केले जात नसल्याने फुटपाथ तयार करण्याची प्रक्रियाच शहरात बंद पडली आहे. विकास आराखड्याच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यालगत असलेले फुटपाथ महापालिकेने जणू आंदण दिलेत. अनेक वर्षांच्या काळात शहरातील फुटपाथने मोकळा श्‍वास घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्नही केले गेलेले नाहीत. एखाद्या भागातील फुटपाथवर हातगाडी, टपऱ्या यांचे अतिक्रमण झाले नसले तर लगेच त्यावर पार्किंगने ताबा केलेला असतो. अशा परिस्थितीत पादचाऱ्यास रस्त्यावर उतरण्यास पर्याय राहत नाही. महापालिकेने या विषयांकडे केलेले दुर्लक्ष आज नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. 

मॉडेल रोडचा मुहूर्तच नाही 
शहराची ‘लाइफलाइन’ असलेले जालना रोड आणि बीड बायपासही या विळख्यातून सुटलेले नाहीत. चिकलठाणा ते बाबा पेट्रोल पंपादरम्यान फुटपाथ, सायकल ट्रॅक आणि ग्रीन स्पेस असलेला मॉडेल रोड तयार करण्याची अनेकदा घोषणा झाली. या सुविधा तर सोडाच; पण अनेक वर्षांत येथे लोकांना उसंत घेण्यासाठी अर्बन स्पेस तयार करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. मकाई गेट ते बौद्ध लेणीदरम्यान मॉडेल रोड तयार करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर भगवान घडमोडे यांनी केली होती; पण पक्षीय राजकारणाने या रस्त्याचाही बळी घेतला.

हुशार माणसांचा तिटकारा?
शहराच्या विकासासाठी अस्तित्वात असलेल्या शहर आराखडा विभागाचा कारभार अवघ्या एक दोघांच्या खांद्यावर देऊन चालणार नाही. त्यासाठी शहरातील तज्ज्ञांचाही सल्ला महत्त्वाचा ठरतो; पण महापालिकेतर्फे असा सल्ले कधीच घेतला जात नाही. शहराच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या विभागाने फुटपाथचा फारसा विचार केलेला नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आपल्याकडे रस्ते रुंद आहेत; पण त्यावर पादचाऱ्यांचा विचार कधीच केला जात नाही. शहराच्या रस्त्यालगत पथ वे, सायकल ट्रॅक असतील तर अपघात टाळता येतील. त्या लगत ग्रीन झोन तयार करून रस्त्यांच्या सीमा आखायला हव्यात. ‘कॅरेज वे’मध्ये इंचभर जागा कमी असावी; मात्र पायी चालणाऱ्यांचीही सोय व्हावी. 
- सौरभ जामकर (नागरिक)

शहरात फारसे फुटपाथ नाहीत. जेथे आहेत त्यांनाही अतिक्रमणांनी वेढले आहे. शहराचा आराखडा तयार करणारी यंत्रणा पादचारी आणि सायकलस्वारांचा विचार करीत नसल्याने अपघात होतच राहणार. जालना रोड आणि बीड बायपासला साधी मोकळी जागा (अर्बन स्पेस) महापालिका तयार करू शकली नाही. 
- अजय कुलकर्णी, वास्तुविशारद, शहरांचे अभ्यासक

Web Title: aurangabad marathwada news walking danger in aurangbada