पेट्रोलपंपावर पाणीमिश्रित इंधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती आटोक्‍यात आणली.

औरंगाबाद - उस्मानपुऱ्यातील भारत पेट्रोलियमच्या युनिक ऑटो सर्व्हिसेस पंपावर वाहनांत पाणीमिश्रित इंधनचा भरणा होत असल्याने एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप करून पंप व्यवस्थापक व मालकाला याचा जाब विचारला. यानंतर तेथे मोठा जमाव झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. नऊ) दुपारी झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती आटोक्‍यात आणली.

पटेल यांच्या युनिक ऑटो सर्व्हिसेसच्या पंपावर काही वाहनधारक आले. त्यांनी वाहनांत पाणीमिश्रित इंधन देत असल्याचा आरोप केला. पंपावरील नोझलमधून येणारे इंधन चक्क पाणीमिश्रित असल्याची बाब समजताच अनेकजणांनी तेथे गर्दी केली. योगेश कोटगिरे यांनीही याच पेट्रोल पंपावरून आपल्या चारचाकी वाहनात डिझेल भरले; पण वाहन व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे त्यांनी वाहनातील डिझेलची तपासणी केली. त्यात पाणीमिश्रित डिझेल असल्याची बाब समोर आली. हा प्रकार त्यांनी पंपव्यवस्थाकांच्या लक्षात आणून दिला. यामुळे पंपचालकही गडबडले.

दरम्यान, पंपावर इंधन भरलेल्यांनीही तेथून जाण्यापूर्वी आपापल्या वाहनातील पेट्रोल तपासले. त्या वेळी त्यांच्या वाहनातही पाणीमिश्रित पेट्रोल दिसून आले. मयूर पाटील, मोहम्मद सलिक अशा दुचाकी ग्राहकांनीही आपल्या दुचाकीत पाणीमिश्रित पेट्रोल असल्याचा या वेळी आरोप केला. यानंतर पंपावर स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक आले व त्यांनी पंपचालकांना जाब विचारण्यास सुरू केले. दरम्यान, घटनास्थळी सहायक आयुक्त गोवर्धन कोळेकर व त्यांचे पथक पंपावर बंदोबस्तासाठी आले. यानंतर पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष अकिल अब्बास अली यांनी घटनास्थळी धाव घेतली.

‘बीपीसीएल’ कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे पंपावरील पेट्रोल आणि डिझेलच्या टाकीमधील पाणी पूर्णपणे बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पंपमालक साधना पटेल यांनी घेतला.

पाणीमिश्रित इंधन मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर आम्ही पंपावर आलो. वैधमापनशास्त्र, पुरवठा विभाग व भारत पेट्रोलियमचे अधिकारी पंपावरील इंधनाचे नमुनेही घेत असून, तपासणीही करीत आहेत. 
- गोवर्धन कोळेकर, सहायक पोलिस आयुक्त

सर्व्हिसिंग व टॅंकरचे लिब्रेशन मोजण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. टॅंकरमधून पाणी पाईपद्वारे काढल्यानंतर पाईपमधील पाणी टॅंकरमध्ये तळाशी राहिले असावे. हे पाणीमिश्रित इंधन तपासून न घेता, थेट पंपावरील टाकीत भरण्यात आले असावे. त्यामुळे टाकीत पाणी वाढले. नोझलचे पाईप टाकीच्या तळाशी असल्याने या नोझलमधून टाकीच्या तळाशी साचलेले पाणी ग्राहकांच्या वाहनात गेले असावे. ती तांत्रिक चूक घडली असावी.
- अखिल अब्बास पटेल, सचिव, औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन

वाहनधारक आक्रमक
पाणीमिश्रित इंधनामुळे पंपावरील इंधनविक्री बंद करण्याची वाहनधारकांनी मागणी केली. वादंगाचा प्रकार पाहून व्यवस्थापकाने ही बाब पंपमालक यांना कळविली. यानंतर मालक साधना पाटील पंपावर आल्या. त्यांना वाहनधारकांनी घेराव घातला व पाणीमिश्रित इंधनाबाबत जाब विचारला. ही समस्या पंपाची नसून इंधन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची असल्याचे सांगितले.

‘पाणी’ कुठे मुरले? 
मयूर पाटील हा त्याच पंपावर पेट्रोल भरून महाविद्यालयात गेला; पण येताना वाहनच सुरू होत नव्हते. त्याने पेट्रोल तपासल्यानंतर त्यात पाणी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पंपव्यवस्थापकाला त्याने जाब विचारला. या वेळी अन्य वाहधारकांनी पंपाचे पेट्रोल व डिझेल तपासण्याची मागणी केली. व्यवस्थापकाने इंधन तपासले. त्यात पाणी आढळून आले; पण इंधनामध्ये पाणी मुरले कसे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.