जल आराखड्याला दिली जलसमाधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

रिपाइं डेमोक्रॅटिकचे आंदोलन - मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याची मागणी
औरंगाबाद - मराठवाड्यावर अन्याय करणाऱ्या जल आराखड्याला रिपाइं डेमोक्रॅटिकतर्फे रविवारी (ता. २३) जलसमाधी देण्यात आली. 

रिपाइं डेमोक्रॅटिकचे आंदोलन - मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याची मागणी
औरंगाबाद - मराठवाड्यावर अन्याय करणाऱ्या जल आराखड्याला रिपाइं डेमोक्रॅटिकतर्फे रविवारी (ता. २३) जलसमाधी देण्यात आली. 

मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाण्याचे वाटप झाले पाहिजे, अशी मागणी घेऊन रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचे राज्य अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. राज्य शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला गोदावरी खोरे एकात्मिक जलविकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे मंडळाने सुरवातीपासूनच मराठवाड्यावर अन्याय करणारा एकात्मिक जलविकास आराखडा तयार केला. यासाठी समिती नेमण्यात आली. मात्र, आराखड्यावर नागरिक, लोकप्रतिनिधी जलतज्ज्ञ व्यक्ती यांच्याकडून आलेल्या हरकती, सूचनांचा विचार केला नाही. त्यामुळे या जल आराखड्याने मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रिपाइंने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हा बोगस जल आराखडा रद्द करावा, मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी रिपाइंतर्फे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर जल आराखड्याला पाण्यात बुडवून जलसमाधी देण्यात आली. या वेळी बोगस जल आराखडा तयार करणाऱ्या जलतज्ज्ञ समितीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश जायभाये, सचिन गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात गौतम गणराज, महेश रगडे, रवी शिरसाट, प्रशांत जाधव, बाबा साबळे, श्रीकांत रणभरे, दिलीप गवळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.