पाण्यासाठी नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडलेले असताना त्यात आता लोडशेडिंगचे संकट ओढवल्यामुळे शहरवासीयांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले आहेत. भारनियमनाच्या वेळेनुसार पाणी देणे शक्‍य नसल्यामुळे महापालिकेने महावितरणचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

औरंगाबाद - शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडलेले असताना त्यात आता लोडशेडिंगचे संकट ओढवल्यामुळे शहरवासीयांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले आहेत. भारनियमनाच्या वेळेनुसार पाणी देणे शक्‍य नसल्यामुळे महापालिकेने महावितरणचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

मंगळवारी (ता. १२) शहरात सुरू झालेल्या भारनियमनाचा फटका पाणीपुरवठ्याला बसला आहे. वारंवार फुटणारी जलवाहिनी, खंडित होणाऱ्या विजेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. अद्याप वेळापत्रक पूर्वपदावर आलेले नाही. अनेक भागांना एक दिवस उशिरा, कमी दाबाने पाणी येत आहे. त्यात आता लोडशेडिंगचे संकट ओढवले आहे. विद्युत पंप लावल्याशिवाय नागरिकांना पाणी मिळत नाही. तिसऱ्या-चौथ्या मजल्यावर राहणाऱ्यांना तर पंपाशिवाय पर्याय नसल्यामुळे लोडशेडिंगच्या काळात पाणी आल्यास त्यांचे हाल होत आहेत. मंगळवारी, बुधवारी लोडशेडिंगच्या काळात नळाला पाणी आले. त्यामुळे भारनियमन आणि पाण्याच्या वेळा यांच्याच सुसूत्रता घालून देण्याची मागणी करणारे रहिवाशांचे फोन नगरसेवकांना सुरू होते. 

महापालिकेने प्रस्ताव धुडकावला 
भारनियमनाच्या वेळेनुसार शहरात पाणीपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रस्ताव महापालिकेने धुडकावून लावला आहे. महावितरण शहरात साडेआठ तास भारनियमन करणार आहे. एवढा वेळ पाणीपुरवठा बंद ठेवणे शक्‍य नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यात नागरिकांचे मात्र हाल सुरू आहेत. 

दोन ठिकाणी पंपिंग 
जिन्सी व दिल्लीगेट येथील पाण्याच्या टाकीवर विद्युत पंप लावून पाण्याचा उपसा करावा लागतो. या ठिकाणी तरी अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.

Web Title: aurangabad marathwada news water shortage