चिकलठाण्यातील आठवडे बाजार बंद पाडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

औरंगाबाद - शेतमालास हमीभावासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आता धार चढत आहे. शुक्रवारी (ता. दोन) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिकलठाणा येथील आठवडे बाजार संभाजी ब्रिगेडने बंद पाडला. संपामुळे बोटावर मोजण्याइतकेच व्यापारी बाजारात येत असतानाच घोषणाबाजी करीत थाटण्यात येणारी दुकाने गुंडाळायला लावली. या वेळी व्यापारी आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादीही झाली.

शेतकरी संपाला गुरुवारी सुरवात झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच शहरातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या जाधववाडी येथे शेतकरी नेते आणि व्यापारी यांच्यात वाद झाले. त्याचे पर्यवसान नंतर हाणामारीत झाले. पालेभाज्यांचे भाव व्यापाऱ्यांनी गगनाला भिडवले. दुसऱ्या दिवशी शहरातील छोट्या-छोट्या बाजारातही अत्यल्प माल दाखल झाला. संप सुरू असताना व्यापाऱ्यांनी देखील त्यात सहभागी व्हावे, अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुकुंदवाडी येथे दररोजचा भरणारा बाजार बंद पाडला. त्यानंतर चिकलठाणा येथील मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या आठवडे बाजारात कार्यकर्ते दाखल झाले. तेथे दुकाने थाटण्याचे काम सुरू असतानाच तातडीने बंद करायला भाग पाडले. तोडगा निघत नाही, तोपर्यंत संपात सहभागी व्हा, अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास व्यापारीच जबाबदार राहतील, असा इशाराही जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राम भगुरे, बाबासाहेब दाभाडे, सरपंच अनिल हिरडे पाटील, शिवक्रांती संघटनेचे सुनील कोटकर, शिवाजी जगताप यांनी दिला.

या वेळी संजय सोमवंशी, डॉ. बन्सी डोणगावकर, विष्णू बैनाडे, रवींद्र बोचरे, अक्षय मेलगर, राजेंद्र पाटील, वैभव बोडखे, पवन खडके, सचिन मगर, आकाश पाटील, ज्ञानेश्‍वर अंभोरे, ईश्‍वर दहीहंडे, प्रल्हाद शेजूळ, महेश देशमुख, पवन औताडे, विठ्ठल खांडेभराड, कैलास हिवाळे, सुनील साबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

संपामुळे शहरात चोरट्या मार्गाने काही व्यापारी भाजीपाला आणत आहेत. मात्र, एरवी स्वस्तात मागणी करणारे ग्राहक आता शेतकऱ्यांच्या नावाने बोटे मोडत चढ्या भावाने त्याची खरेदी करीत आहेत. या संपाचे चटके बसण्यास सुरवात झाली असून शेतीची किंमत काय असते, हे त्यांना आता जाणवू लागले आहे. हे शेतकऱ्यांचे यशच म्हणावे लागेल.
- प्रमोद नांगरे, शेतकरी, सातारा परिसर.

भाजीपाला सुकलेला असेल तर कमी किमतीत मागतात. मात्र, तो का सुकला, तो कसा वाढवला, जगवला असेल, यामागे किती कष्ट असतील, त्याचा खरंच मोबदला मिळतो, याबद्दल कधीच विचार केला जात नाही. आता बाजारात मिळेल ती भाजी मागेल तेवढ्या पैशात गुपचूप खरेदी करण्याचे काम सुरू आहे. शेतमालास योग्य भाव मिळायलाच हवा.
- अमोल गायकवाड, शेतकरी, डिघी, ता. गंगापूर.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

06.57 PM

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

06.09 PM

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

05.30 PM