एसटीच्या सर्वच बसमध्ये "वायफाय'

प्रकाश बनकर
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

चांगल्या प्रतिसादामुळे निर्णय - सध्या 50 टक्के गाड्यांत सुविधा

चांगल्या प्रतिसादामुळे निर्णय - सध्या 50 टक्के गाड्यांत सुविधा
औरंगाबाद - राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेल्या "वायफाय' सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसताच आता सर्वच बसमध्ये ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाच्या ताफ्यात सर्व प्रकारच्या सुमारे 18 हजार बस असून सध्या निम्म्या म्हणजे 9 हजार बसमध्ये "वायफाय' आहे. उर्वरित बसमध्ये दोन-तीन महिन्यांत ही सेवा देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी "सकाळ'ला दिली.

मोबाईल इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन महामंडळाने आपल्या प्रवाशांसाठी डिसेंबर 2016 पासून "वायफाय' सेवा सुरू केली. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर पुणे, मुंबई, रायगड, पनवेल, कोल्हापूर विभागांतील 350 गाड्यांमध्ये ही सुविधा दिली गेली. हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे दिसताच पुढील टप्प्यात राज्यभरातील सर्वच विभागांतील बसमध्ये "वायफाय' देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील काही विभागांत ही सेवा कार्यान्वित करण्यात आली. येत्या दो-तीन महिन्यांत उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होईल, असे देओल यांनी सांगितले.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा एक भाग म्हणून बसमध्ये "वायफाय'ची सुविधा सुरू केली. सध्या पन्नास टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
- रणजितसिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ.