संतप्त महिलांनी पाण्यासाठी आमदारांसमोर फोडला माठ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - रस्त्याचे भूमिपूजन कसले करता, आधी पाण्याचा प्रश्‍न सोडवा, अशा शब्दांत संताप व्यक्त करीत एका महिलेने आमदार अतुल सावे यांच्यासमोर माठ फोडल्याने खळबळ उडाली. ही घटना गजानननगर भागात शनिवारी (ता. ११) सकाळी घडली. पाणी देणे महापालिकेचे काम आहे, मी प्रयत्न करतो, असे सांगत श्री. सावे यांनी महिलेची समजूत काढून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उरकून घेतले. 

शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्याचा फटका शनिवारी आमदार सावे यांना बसला. त्यांच्या विकास निधीतून गारखेडा भागातील गजानननगर येथे एका रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार होते.

कार्यक्रमाला श्री. सावे यांच्यासह वॉर्डाचे नगरसेवक आत्माराम पवार तसेच परिसरातील नागरिक, महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम सुरू असताना गल्ली नंबर सातमधील महिला तिथे पोचली. तिने श्री. सावे भूमिपूजनाची कुदळ मारण्यासाठी पुढे सरसावताच पाणीप्रश्‍नावरून जाब विचारला. तीन वर्षांपासून पाण्यासाठी पाठपुरावा करत असताना अद्याप पाणी मिळालेले नाही. या भागात पाइपलाइन का टाकली जात नाही? नगरसेवकाकडे विचारणा केली असता आम्हाला समांतर पाणीपुरवठा योजना झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही, असे उत्तर दिले जाते. रस्ता करताय मात्र त्याआधी पाण्याची लाइन टाका आणि मग रस्ता बनवा, असे या महिलांनी सुनावले. त्याचवेळी यातील एका महिलेने पुढे येत माठ फोडला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. काहींनी मध्यस्थी केली. आमदारांनीही पाण्याचा विषय महापालिकेच्या अखत्यारीतील आहे. तुम्ही सोमवारी माझ्याकडे या, प्रश्‍न सोडवू, असे आश्‍वासन दिले. या वादानंतर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.

कामे करताना नगरसेवक अनभिज्ञ
आमदार निधीतून कामे करताना नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. अनेक ठिकाणी पाण्याची लाइन नसताना रस्ते करण्यात येत आहेत. भविष्यात पाण्याची लाइन टाकताना रस्ते फोडावे लागणार आहेत. त्यामुळेदेखील नागरिकांमध्ये रोष असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.  

Web Title: aurangabad marathwada news women agitation for water