सामाजिक जाणिवा जपत ‘यिन’चा तिसरा वर्धापनदिन जल्लोषात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - तीन वर्षांतील सामाजिक कार्य नव्या मित्रांसमोर ठेवत आगामी काळातही सामाजिक भान जपत प्रश्‍नांची सोडवणूक करायची, असा मंत्र ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. १९) देण्यात आला. यावेळी विविध उपक्रम घेण्यात आले. जल्लोषपूर्ण वातावरणाने युवक भारावून गेले होते. दरम्यान, केकही कापण्यात आला.

औरंगाबाद - तीन वर्षांतील सामाजिक कार्य नव्या मित्रांसमोर ठेवत आगामी काळातही सामाजिक भान जपत प्रश्‍नांची सोडवणूक करायची, असा मंत्र ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. १९) देण्यात आला. यावेळी विविध उपक्रम घेण्यात आले. जल्लोषपूर्ण वातावरणाने युवक भारावून गेले होते. दरम्यान, केकही कापण्यात आला.

‘सकाळ’च्या टाऊन सेंटर येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात श्रीमती धानोरकर यांनी ‘यिन’ सदस्यांना मार्गदर्शन केले. ‘यिन’ची सुरवात झाल्यापासून अवघ्या तीन वर्षांत महाराष्ट्रात २५ लाख विद्यार्थ्यांचे संघटन तयार केले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व सामाजिक भान निर्माण करीत समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे.

समाजाला नवी दिशा, नवी आशा देण्याचे काम यिनचे सदस्य करीत आहेत. मागील तीन वर्षांत केलेल्या सामाजिक कार्यातून झालेल्या बदलाची माहिती यावेळी नवीन सदस्यांना देण्यात आली. नव्याने यिनमध्ये सहभागी झालेल्या युवकांनीसुद्धा हा वारसा, नवी वाटचाल म्हणून आम्ही सक्षमपणे चालवू, अशी ग्वाही दिली. शहरापासून वाडी-तांड्यांवरील प्रश्‍नांची चाहूल लागताच आपण त्यावर मार्ग काढण्याचे काम करू, असेही युवकांनी बोलून दाखविले.

‘यिन पॉकेट’च्या पोस्टर्सचे अनावरण
यावेळी ‘यिन पॉकेट’ या उपक्रमाच्या पोस्टर्सचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. गरजू अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी ‘यिन पॉकेट’ हा नवा उपक्रम मार्गदर्शक ठरेल, असा आशावाद यावेळी व्यक्‍त करण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रंथ संकलित करण्यात येणार असून, गरजूंना ते वितरित केले जाणार आहेत.

संकटांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा - अंजली धानोरकर
‘‘देशाला प्रगत करण्यासाठी सामाजिक जाणिवा असलेल्या युवकांच्या एकजुटीची गरज आहे. तुम्ही किती हुशार आहात, यापेक्षा तुम्हाला किती सामाजिक दृष्टिकोन आहे, याच गोष्टी जगण्यासाठी, सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाच्या आहेत,’’ असे मत उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी व्यक्‍त केले. 

तसेच संकटेच माणसाला सक्षम बनवतात, त्यामुळे संकटांना आत्मविश्‍वासाने सामोरे जा, असे आवाहनही त्यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘‘या देशाचे खरे आधारस्तंभ युवकच आहेत. ‘सकाळ’ने यिनच्या माध्यमातून राज्यातील २५ लाख सामाजिक बांधिलकी असलेल्या युवकांची बांधणी केली. ही गौरवास्पद बाब आहे. यिनच्या सदस्यांनी अन्य युवकांनादेखील यात सहभागी करून घ्यावे. 

पूर्वी हुशारीला किंमत होती, आता सामाजिक जाण असली तरच हुशारीला किंमत आहे. नैराश्‍य आलेल्या युवकांची संख्याही अधिक आहे. अशांना त्यातून बाहेर काढण्यासाठी यिनने आपली जबाबदारी समजून पुढे यावे. समस्या येतात आणि जातात. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. खरे तर समस्याच माणसाला सक्षम बनवत असतात. कुठल्याही संकटांना, समस्यांना आत्मविश्‍वासाने सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

स्वत:ला लिमिटेशन घालणे बंद करावे. आत्मविश्‍वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही. यिन सदस्यांच्या कामगिरीतून मोठे सामाजिक बदल होत आहेत,’’ असेही त्यांनी नमूद केले. यावेळी ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड  यांनी मार्गशन केले. यिनचे गृहमंत्री विवेक पवार, राज्यमंत्री परमेश्‍वर इंगोले यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.  याप्रसंगी ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे सरव्यवस्थापक रमेश बोडके उपस्थित होते. सागर मिरगे यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी मोरे हिने आभार मानले. यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

शहरातील आरोह बँड ग्रुपचे परितीश अरोरा, आदर्श सहा, प्रथमेश, श्रद्धा व अमेय यांनी वादनासोबत गायन केले. भगवानबाबा बालिकाश्रमातील मुलींनी स्वागतगीत गायिले. कार्यक्रमासाठी यिन समन्वयक ऐश्‍वर्या शिंदे, आरोग्य महामंडळाचे अध्यक्ष साजीद शेख, सुनील डिडोरे, तेजस गुळवे यांनी पुढाकार घेतला.