यात्रा ऑनलाईन कंपनीला अजिंठा लेणी दत्तक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या "वारसास्थळ दत्तक योजने'तून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसराचा विकास केला जाणार आहे. या कामासाठी "यात्रा ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची निवड करण्यात आल्याचे बुधवारी (ता. 25) नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले. सीएसआर योजनेतून या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. 

जागतिक पर्यटन दिनानिमित्त 27 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत केंद्रीय पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्यात झालेल्या समन्वय करारानुसार ऐतिहासिक वास्तूंच्या विकासासाठी खासगी कंपन्यांच्या सहभागातून "वारसास्थळ दत्तक योजने'ची सुरवात झाली. या योजनेत देशातील 14 स्मारकांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांना आवाहन करण्यात आले होते. 

केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथील राजपथ लॉनवर बुधवारी (ता. 25) "पर्यटन पर्व' कार्यक्रमाच्या समारोपाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी दत्तक योजनेसाठी आलेल्या 57 प्रस्तावांपैकी सात कंपन्यांच्या नावांची घोषणा करण्यात आल्याचे पर्यटन सचिव रश्‍मी वर्मा यांनी सांगितले. यात अजिंठा लेणीसाठी "यात्रा ऑनलाईन प्रा. लि.'ची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी "स्मारक मित्र' म्हणून ओळखली जाणार असून, सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) अजिंठा लेणीच्या परिसरात पर्यटकांना आवश्‍यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, तसेच या लेण्यांच्या संवर्धनाशी संबंधित कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. 

या योजनेनुसार अजिंठा लेणीसह दिल्लीतील जंतर-मंतर, कुतुबमिनार, सफदरजंगचा मकबरा, अग्रसेनाची विहीर आणि पुराना किल्ला या स्मारकांचा समावेश आहे. यासोबतच ओडिशातील कोणार्कचे सूर्यमंदिर, भुवनेश्‍वरचे राजाराणी मंदिर, रतनगिरी स्मारक, कर्नाटकातील हम्पी, लडाख प्रांतातील लेहचा राजवाडा व स्टोक कांगरी, केरळातील कोचीचे मत्तानचेरी राजवाडा संग्रहालय, उत्तराखंड येथील गंगोत्री मंदिर व गोमुख येथील त्रिभुज प्रदेश या ठिकाणी पर्यटनपूरक कामे केली जातील.