चिनी कंपनीची कचऱ्याचा डोंगर कमी करण्याची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - चीनच्या बासको कंपनीने औरंगाबाद शहरातील सलीम अली सरोवराचे घाण पाणी स्वच्छ करण्याचे व नारेगावातील कचऱ्याचा डोंगर कमी करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. या कंपनीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चीनमधील नानीयांग शहरात येऊन कंपनीने विकसित केलेल्या प्रकल्पांना भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता लवकरच पालिका अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चीनला जाण्याची शक्‍यता आहे. 

चीन येथील बासको कंपनीचे शिष्टमंडळ शुक्रवारी (ता. चार) शहरात आले आहे. या कंपनीतर्फे जगभरातील 210 शहरांमध्ये सांडपाण्याचे शुद्धीकरण, तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प राबविण्यात येतात. त्यानुसार कंपनीचे संचालक ली सीयुआन, अभिजित चौधरी, हुआंग बिंगग्युई, श्रेया अग्रवाल यांनी काल महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासोबत चर्चा करून सलीम अली सरोवर, नारेगाव येथील कचरा डेपोची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी पुन्हा या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. 

या संदर्भात आयुक्त श्री. मुगळीकर म्हणाले, सलीम अली सरोवरातील दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याची कंपनीची तयारी आहे. 50 टक्के खर्चही ते करणार आहेत. तसेच नारेगाव येथील कचऱ्याच्या डोंगरावर प्रक्रिया करण्याचीही कंपनीची तयारी आहे. कंपनीने चीनमधील नानीयांग शहरात घनकचऱ्याच्या विघटनाचे काम केले असून, हे काम पाहण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावे, असे निमंत्रण कंपनीतर्फे देण्यात आले आहे. त्यानुसार सर्वसाधारण सभेच्या परवानगीने महापालिका अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चीनला जाईल. कंपनीला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव मंजूर केला तर त्याला राज्य व केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागेल, अशी माहिती आयुक्त श्री. मुगळीकर यांनी दिली.