महापालिकेत आता ऐनवेळचे ठराव बंद

महापालिकेत आता ऐनवेळचे ठराव बंद

औरंगाबाद - महापौर भगवान घडामोडे यांनी ऐनवेळी घेतलेल्या ठरावाचे एक एक वादग्रस्त प्रकरण समोर येत असल्याचा भाजपने धसका घेतला आहे. शनिवारी (ता. २३) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे महापालिकेत एकही ऐनवेळचा प्रस्ताव येणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. करवसुलीच्या खासगीकरणाला देखील पक्षाचा विरोध असल्याचे पुन्हा एकदा सांगण्यात आले. बडतर्फ अधिकाऱ्यांचे वेतन देण्याचा प्रस्ताव आलेलाच नाही, असे महापौरांनी या वेळी सांगितले.

महापौर घडामोडे यांनी शहरातील मालमत्ता करवसुलीच्या खासगीकरणाचा प्रस्ताव चर्चा न करता ऐनवेळी मंजूर केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १९) झालेल्या सर्वसाधारण सभेत समोर आला होता. त्यामुळे शिवसेनेसह विरोधी पक्षांनी महापौरांची कोंडी करीत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. सर्वसाधारण सभेतील या गोंधळानंतर दुसऱ्याच दिवशी साफसफाईचे खासगीकरण करण्याचा ठराव देखील ऐनवेळी घेण्यात आल्याचे समोर आले. 

या दोन्ही ठरावांनंतर सूचक, अनुमोदक असलेल्या नगरसेवकांनी महापौरांनी या प्रस्तावावर चर्चा न करता तो मंजूर केला. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. त्यातच आता भाजपचे आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनीही करवसुलीच्या खासगीकरणाला विरोध असल्याची भूमिका जाहीर केली. या दोन्ही प्रकरणांचा वाद शमत नाही तोच शुक्रवारी एका अधिकाऱ्याचे बडतर्फीच्या  काळातील वेतन देण्याचा ऐनवेळी प्रस्ताव घुसडण्यात आल्याचेही समोर आले. 

एकापाठोपाठ एक प्रकरणे समोर येत असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असून, त्याची भाजपने चांगलीच धास्ती घेतली आहे. शनिवारी प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार सावे, महापौर घडामोडे, शहराध्यक्ष तनवाणी, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, गटनेते प्रमोद राठोड यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यापुढे महापालिकेत ऐनवेळचे प्रस्ताव येणार नाहीत, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली. बडतर्फ अधिकाऱ्याचा विषय आलाच नाही, असे महापौरांनी सांगितले. मालमत्ता करवसुलीच्या खासगीकरणाला पक्षाचा विरोध असल्याचे श्री. सावे, श्री. तनवाणी यांनी सांगितले. त्यामुळे खासगीकरणाच्या विषयावर महापौरांना या वेळी नमते घ्यावे लागले. नगरसेवक राजू शिंदे, गोकुळ मलके, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांची उपस्थिती होती. 

गटनेते दोन महिने कुठे होते? 
मालमत्ता कर व साफसफाईच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावर शिवसेनेचे सभागृहनेते गजानन मनगटे, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी सह्या केल्या. आज हेच लोक आपली फसवणूक झाल्याचे सांगत आहेत. दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव मंजूर झाला. या काळात ते गप्प का होते, असा सवालही महापौरांनी पत्रकार परिषदेत केला.

ऐनवेळचे सर्वच विषय रद्द करा 
या संदर्भात सभागृहनेते गजानन मनगटे यांच्याशी संपर्क साधला असता, यापुढे ऐनवेळचे विषय घेण्यात येणार नाहीत, हा निर्णय चांगला असला तरी आतापर्यंत घेण्यात आलेल्या ठरावाचे काय? असा प्रश्‍न त्यांनी केला. यापूर्वीचे ऐनवेळचे सर्वच ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी महापौर तुपेंना क्‍लीन चिट का? 
ऐनवेळी प्रस्ताव घेण्याची १९८८ पासूनची परंपरा आहे. मात्र, माझ्याच काळातील ऐनवेळच्या प्रस्तावावर वाद का? असा सवाल या वेळी महापौरांनी पत्रकारांना केला. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी स्वतःच्या नावाचा महापालिकेतून बाजार समितीवर जाण्याचा प्रस्ताव ऐनवेळी घेतला; मात्र त्यावर कसलाच वाद झाला नाही, असे महापौरांचे म्हणणे होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com