कर्मचारी आऊटसोर्सिंगचा आज ‘स्थायी’समोर प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

अशी आहे कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता 
अभियंता, दुय्यम आवेक्षक    ६५
कनिष्ठ लिपिक    २० 
सुरक्षा रक्षक    २० 
स्वच्छता निरीक्षक    २०
वाहनचालक    आवश्‍यकतेनुसार 

औरंगाबाद - महापालिकेने कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. गुरुवारी (ता. सहा) स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांची मोठी अडचण दूर होणार असल्याचा दावा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी केला.

महापालिकेत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाले आहेत. मात्र, रिक्त जागांवर अद्याप नोकर भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या अतिरिक्त पदभारावरच कामकाज सुरू आहे. दरम्यान, शासनाने कर्मचारी भरतीसाठी आकृतिबंध तयार करण्याचे आदेश दिले आहेत. आकृतिबंध तयार झालेला असताना दुसरीकडे प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

किमान वेतनाचा नियम पाळा
महापालिकेत कंत्राटी कामगार भरती करताना किमान वेतनाचा नियम पाळण्यात यावा, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी केली आहे. महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केलेल्या संस्थांनी वेतन अत्यल्प दाखविले आहे. किमान वेतनासंदर्भात शासनाने आदेश दिलेले आहेत. अंमलबजावणी करण्यात आली नाही तर न्यायालयात जाऊ, असा इशारा खरात यांनी दिला.