‘ऑरिक’मध्ये उद्योग स्थापनेसाठी अन्नप्रक्रिया मंत्रालयाचे रेड कार्पेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरिक)मध्ये अन्नप्रक्रिया उद्योगांनी यावे, यासाठी केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने रेड कार्पेट अंथरले आहे. ‘डीएमआयसी’अंतर्गत येणाऱ्या ऑरिकमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन करणारे पत्र मंत्रालयाचे उपसंचालक श्‍यामसुंदर अग्रवाल यांनी गेल्या आठवड्यात काढले आहे.

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (ऑरिक)मध्ये अन्नप्रक्रिया उद्योगांनी यावे, यासाठी केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने रेड कार्पेट अंथरले आहे. ‘डीएमआयसी’अंतर्गत येणाऱ्या ऑरिकमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन करणारे पत्र मंत्रालयाचे उपसंचालक श्‍यामसुंदर अग्रवाल यांनी गेल्या आठवड्यात काढले आहे.

देशात दिल्ली-मुंबई औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून आठ औद्योगिक शहरांची निर्मिती होत आहे. या शहरांमध्ये आता पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. या आठपैकी चार शहरांमध्ये आता जमिनीचे वितरण करण्यात येते आहे. यात ढोलेरा (गुजरात), औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी (महाराष्ट्र), इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल टाऊनशिप (ग्रेटर नोएडा) आणि विक्रम उद्योग पुरी प्रकल्प (मध्य प्रदेश) येथील जमिनीचे वितरण सध्या सुरू आहे. औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीच्या माध्यामातून शेंद्रा आणि बिडकीनमध्ये या उद्योगनगरीचे काम जोमाने सुरू आहे. या ‘डीएमआयसी’अंतर्गत येणाऱ्या उद्योग वसाहतींचा आपल्या नव्या प्रकल्पांसाठी विचार करावा. ज्या कंपन्यांना फूडपार्क विकसित करायचे आणि नव्या उद्योगांची उभारणी करायची आहे, त्यांनी या नव्याने तयार होत असलेल्या औद्योगिक वसाहतींचा सकारात्मक विचार करण्याचे आवाहन अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

पैठणच्या फूडपार्कचाही फायदा 
पैठणमध्ये उभारी घेत असलेले फूडपार्क ११० एकरमध्ये राहणार आहे. येथे अन्नप्रक्रिया प्रकल्पांना सुविधा व्हावी, यासाठी वेअर हाऊस, पॅक हाऊससारख्या अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचा फायदा ‘ऑरिक’मध्ये उभारल्या जाणाऱ्या उद्योगांनाही होणार आहे. या वसाहतींमध्ये आपले उद्योग सुरू करणाऱ्यांना शासनाच्या योजनांचाही लाभ होणार आहे. सरकारने अन्नप्रक्रिया उद्योगांच्या क्‍लस्टरसाठी घोषित केलेल्या किसान संपदा योजनेचाही फायदा येथील उद्योगांना मिळणार आहे. 

‘डीमआयसी’च्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलणीनंतर आम्ही हे पत्र काढले आहे. पैठण येथे तयार होणाऱ्या फूड पार्कचा फायदा ‘ऑरिक’मध्ये उभारल्या जाणाऱ्या अन्नप्रक्रिया उद्योगांना होणार आहे. शासकीय योजनांसह अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी अमलात येणाऱ्या किसान समृद्धी योजनेचाही लाभ त्यांना होणार आहे. 
- श्‍याम सुंदर अग्रवाल, उपसंचालक, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली