बिल्डर समीर मेहताला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - फ्लॅटसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांना बनावट पत्र देऊन भागीदारीतील संयुक्त खात्यात कर्जाचे धनादेश न टाकता २७ कोटी १३ लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यात वळविली. या फसवणूक प्रकरणात शहरातील ‘आर. के. कॉन्स्ट्रो’चे मालक समीर मेहता यांना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. २८) मध्यरात्रीनंतर करण्यात आली.

औरंगाबाद - फ्लॅटसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांना बनावट पत्र देऊन भागीदारीतील संयुक्त खात्यात कर्जाचे धनादेश न टाकता २७ कोटी १३ लाख रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यात वळविली. या फसवणूक प्रकरणात शहरातील ‘आर. के. कॉन्स्ट्रो’चे मालक समीर मेहता यांना आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. २८) मध्यरात्रीनंतर करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले, की विजय मदनलाल अग्रवाल व त्यांचे मित्र कमलकिशोर तायल; तसेच गोपाल अग्रवाल (रा. सिडको एन-तीन) यांच्या संयुक्त मालकीच्या ‘सिद्धिविनायक एंटरप्रायजेस’ या फर्मच्या नावाने हिरापूर (ता.जि. औरंगाबाद) येथे पाच एकर जमीन आहे. ही जमीन त्यांनी फेब्रुवारी २०११ मध्ये ‘आर. के. कॉन्स्ट्रो’चे मालक समीर मेहता यांना विकसित करण्यासाठी दिली होती. याचा एक करारनामाही करण्यात आला. यात फ्लॅट विक्रीतून आलेली रक्कम ‘सिद्धिविनायक एंटरप्रायजेस’ व ‘आर. के. कॉन्स्ट्रो’ यांनी महाराष्ट्र बॅंकेत उघडलेल्या ‘फोर्थ डायमेन्शन्स प्रोजेक्‍ट इस्क्रो अकाउंट’ या खात्यात संयुक्तरीत्या भरावी असे ठरले होते. जमा होणारी ४५ टक्के ‘सिद्धिविनायक एंटरप्रायजेस’, तर उर्वरित ५५ टक्के रक्कम ‘आर. के. कॉन्स्ट्रो’ यांना मिळेल असे करारनाम्यात होते; परंतु एकवेळा मेहता यांनी ‘फोर्थ डायमेन्शन’ या संयुक्त खात्यात रक्कम भरणा केली. मात्र, त्यानंतर ग्राहकांना फ्लॅटसाठी कर्ज देणाऱ्या बॅंकांना आपल्या अधिकारातून बनावट पत्र दिले. यात उर्वरित कर्जाचे सर्व धनादेश ‘आर. के. कॉन्स्ट्रो ४ डी. व आर. के. प्रोजेक्‍ट प्रा. लि.’ या खात्याच्या नावाने धनादेश द्यावेत, असे बॅंकांना लेखी कळविले. त्यानंतर ही रक्कम स्वत:च्याच दोन्ही खात्यांत जमा करून घेत स्वत:साठी वापरली. 

या प्रकरणात फिर्यादी विजय अग्रवाल यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. या प्रकरणात अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, समीर मेहतांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, विलास कुलकर्णी, प्रकाश काळे, गणेश शिंदे, दत्तू गायकवाड, विठ्ठल फरताळे, कारभारी गाडेकर, सुनील फेफाळे, योगेश तळवंदे, विनोद खरात, जयश्री फुके यांनी केली.

जीपीए रद्द करूनही फ्लॅट्‌स विकले
समीर मेहता यांना ३० ऑक्‍टोबर २०१४ रोजी दिलेला ‘जीपीए’ सिद्धिविनायक एंटरप्रायजेस यांनी रद्द केला व रजिस्ट्री कार्यालयात ‘लीज ऑफ पेंडन्सी’ची नोंद केली. असे असतानाही मेहता यांनी स्वत:च्या लाभासाठी गृहप्रकल्पातील सर्व ४७२ फ्लॅट्‌सची अंदाजित दहा ते सोळा लाख रुपये प्रतिफ्लॅट दराने विक्री केली.

विश्‍वास बसावा म्हणून...
समीर मेहतांनी भागीदारांचा विश्‍वास बसावा म्हणून ग्राहकांकडून मिळालेल्या पहिल्या धनादेशची रक्कम ‘फोर्थ डायमेन्शन्स प्रोजेक्‍ट इस्क्रो अकाउंट’ या खात्यात भरली; पण त्यानंतरच्या सर्व रकमा संयुक्त खात्याऐवजी त्यांनी स्वत:च्या खात्यात वळविल्या. ही रक्कम २७ कोटी १३ लाखांच्या घरात आहे.

करार रद्द केल्यानंतरही खुलेआम व्यवहार
या प्रकरणी समीर चंद्रकांत मेहता याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मेहताने ज्या बनावट कागपत्रांच्या आधारे व्यवहार केला व सदनिकांची रजिस्ट्री केली, ती कागदपत्रे जप्त करणे बाकी आहे; तसेच आरोपी-फिर्यादीचा करार रद्द झाल्यानंतरही मेहताने ग्राहकांशी व्यवहार कसा काय केला, याबरोबरच २७ कोटी १३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी सखोल तपास करणे बाकी असल्याने मेहताला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील झरीना दुर्राणी यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी मेहताला बुधवारपर्यंत (ता. ३०) पोलिस कोठडी सुनावली.