औरंगाबादचा प्रणव होणार सैन्यदलात अधिकारी

औरंगाबादचा प्रणव होणार सैन्यदलात अधिकारी

औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवेच्या (सीडीएस) परीक्षेत औरंगाबादच्या प्रणव चौधरीने लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याने देशातून चौथा रॅंक पटकाविला. गेल्या शुक्रवारी ‘सीडीएस- २०१७’चा निकाल जाहीर झाला. प्रणवच्या यशाने औरंगाबाद शहराच्या लौकिकतेत आणखी भर पडली आहे. 

शहरातील उल्कानगरीतील प्रणवने प्राथमिक शिक्षण ‘टेंडर केअर होम’मधून पूर्ण केले. सरस्वती भुवन महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर ‘एनडीए’साठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. मौखिक परीक्षेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. लहानपणापासून सैन्यदलात जाण्याचे प्रणवचे स्वप्न होते. त्यामुळे अपयशाने खचून न जाता त्याने अपयशाची कारणे शोधत स्वतःमधील उणिवा दूर केल्या. दरम्यान, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेत तीन वर्षांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस’ची (सीडीएस) लेखी परीक्षा दिली. मार्च २०१७ मध्ये निकाल लागला आणि प्रणव मुलाखतीस पात्र ठरला.

त्यानंतर जुलैमध्ये सर्वांत ‘टफ’ समजल्या जाणाऱ्या सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्डाच्या तोंडी परीक्षेत प्रणव उत्तीर्ण झाला. देशभरातून ‘सीडीएस’च्या लेखी परीक्षेसाठी दरवर्षी साडेपाच लाख मुले पात्र ठरतात. त्यापैकी तीन हजार मुले तोंडी परीक्षा देतात. त्यातून दीडशे मुलांची निवड संरक्षण सेवेसाठी केली जाते. दरम्यान, वैद्यकीय चाचणीनंतर तोंडी आणि लेखी परीक्षेची रॅंकिंग लिस्ट शुक्रवारी (ता. १७) प्रसिद्ध झाली. यात प्रणव देशातून चौथ्या क्रमांकावर होता. जानेवारी २०१८ मध्ये प्रणव डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये (आयएमए) दीड वर्षाचे खडतर प्रशिक्षण घेणार आहे. ते पूर्ण केल्यानंतर तो सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून रुजू होईल. 

उणिवा दूर केल्याने यश
आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल प्रणव ‘सकाळ’शी बोलताना म्हणाला, ‘पाहिलेले स्वप्न पूर्ण करताना अपयशही येऊ शकते. याचा अनुभव मी घेतला आहे; मात्र अपयशाची कारणे शोधून इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यातील उणिवा दूर केल्या. त्यामुळे यशापासून मला कुणी रोखू शकले नाही. यशापयशात माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मदत केली. आत्मविश्वास वाढविण्यासाठी बळ दिले, त्यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो. वडील सुनील चौधरी पुण्याच्या एका खासगी कंपनीत नोकरी करतात. तर आई स्वाती शिक्षिका आहे. मोठी बहीण सुरभी मुंबईत तंत्रज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेऊन मुंबईतच नोकरी करते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com