दाटला साऱ्या कुटुंबातच अंधार....

प्रा. डॉ. रवीद्र भताने
गुरुवार, 13 जुलै 2017

मदतीची गरज
सुलोचनाबाईचे कुटुंब हे जन्मतः अंध नसून त्यांना अचानक अंधत्व आले आहे. सुरवातीपासूनच हलाखीची स्थिती असल्याने खर्च करणे शक्‍य नसल्याने त्या दवाखान्याची पायरीही चढलेल्या नाहीत. या कुटुंबाला उभारी देण्यासाठी मदतीची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहन परिसरातून केले जात आहे.

चापोली - कुटुंबातील बहुतांश सदस्यांना अचानक आलेल्या अंधत्वामुळे साऱ्या कुटुंबातच अंधार दाटलाय. मुळातच आर्थिकस्थिती नाजूक असलेल्या या कुटुंबाला अंधत्त्वाचे आघातांवर आघात पहायला मिळाले. कुटुंब खचले नाही, नव्याने उभे राहण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी आधार ठरल्या आहेत, कुटुंबाची जबाबदारी पडलेल्या साठ वर्षीय आजीबाई. अर्थात त्याही अंधच. अन्य सदस्यांच्या साथीने मिळेल ते काम करून त्या मोठ्या जिद्दीने कुटुंबाचा गाडा हाकण्याची धडपड करीत आहेत....

चापोली (ता. चाकूर) येथील पेटकर कुटुंबाची ही कहाणी. सुलोचनाबाई पांडुरंग पेटकर (वय ६०) या कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचा संघर्ष सर्वांना प्रेरणादायी असाच आहे.

घरात सर्वकाही सुरळीत सुरू असताना साधारणतः ३० वर्षांपूर्वी पती पांडुरंग पेटकर यांचे निधन झाले. पदरी लहान मुलगा नामदेव, मुलगी मीना व संसाराची जबाबदारी पडली. सुलोचनाबाईने मोठ्या कष्टाने मुलाला व मुलीला लहानाचे मोठे केले. पतीच्या निधनानंतर सुलोचनाबाईंना अंधत्व आले. खचून न जाता त्यांनी नामदेव व मीनाच्या नजरेनेच जग पाहात कुटुंबाचा गाडा ओढला. नियतीला हेही मान्य नव्हते. विवाहित मुलगी मीनाला २०१० मध्ये अंधत्व आले. पतीने तिला सोडून दिले. तेव्हापासून मीना आपल्या अंध आईकडेच आली. नियतीचा आघात अजून बाकी होता की काय, नामदेवलाही २०१२ मध्ये अचानक अंधत्व आले आणि संपूर्ण कुटुंबाच्या जीवनातच काळोख पसरला. पत्नी, दोन मुले, मुलगी, असा नामदेवचा परिवार. अंधत्वामुळे नामदेवला काम मिळण्यात अडचणी आल्या. घरोघरी कपडे धुण्याचे काम करून त्याची पत्नी संसाराला हातभार लावत आहे. सुलोचनाबाई सध्या घरोघरी भांडी घासून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. त्यात त्यांना मुलगी मीनाही मदत करते. काम करण्याचे कौशल्य, सहानुभूती, प्रामाणिकपणा आदींमुळे त्यांना गावात सहज काम मिळते.

नामदेवची पत्नी, चिमुकली लेकरे वगळता कुटुंबातील सर्वच सदस्य अंध आहेत. जिद्दीने मजलदरमजल करीत पेटकर कुटुंबीय उद्‌भवलेल्या स्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा हा संघर्ष हेलावून टाकणारा, तितकाच प्रेरणादायीही आहे.

टॅग्स