दहा लाख रुपयांत रेल्वेच्या ‘टीसी’ची नोकरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - रेल्वेतील टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (ता. १६) अटक करण्यात आली. मनोजदादा जगताप (रा. बांभर्डी ता. बारामती) असे संशयिताचे नाव आहे.

औरंगाबाद - रेल्वेतील टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बुधवारी (ता. १६) अटक करण्यात आली. मनोजदादा जगताप (रा. बांभर्डी ता. बारामती) असे संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणी बेरोजगार तरुण सज्जन हिराचंद घुसिंगे (रा. गोकुळवाडी, ता. गंगापूर) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, रेल्वे विभागामध्ये टीसीची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घुसिंगेकडून संशयित आरोपी अमोल मधुकर गांगुर्डे (वय ३५, रा. दिग्वत, ता. चांदवड, ता. नाशिक), तसेच दुसरा संशयित आनंद कचरू वानखेडे (वय २६, रा. पाथरशेंबे, ता. चांदवड) आणि तिसरा संशयित व मुख्य सूत्रधार मनोजदादा जगताप (वय ३२, रा. बांभर्डी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी दहा लाख रुपये घेऊन रेल्वे विभागाचे बनावट शिक्के असलेले बनावट नियुक्तपत्र दिले होते. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर घुसिंगे याने दिलेल्या तक्रारीवरून दौलताबाद ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणी संशयित आनंद वानखेडे याला १८ ऑक्‍टोबर २०१६ रोजी अटक करण्यात आली होती, तर दुसरा संशयित अमोल गांगुर्डेला १० ऑगस्ट २०१७ रोजी अटक करून १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी मुख्य सूत्रधार मनोजदादा याला बुधवारी (ता. १६) बारामतीमधून अटक करण्यात आली. 

शनिवारपर्यंत पोलिस कोठडी 
जगताप याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला शनिवारपर्यंत (ता. १९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे. के. कुरंदळे यांनी दिले. रक्कम जप्त करणे बाकी आहे, तसेच संशयितांनी रेल्वेचे बनावट शिक्के, बनावट नियुक्तिपत्र कुठून व कोणाकडून आणले, या गुन्ह्यामध्ये रेल्वेचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का, आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे संशयितास पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली.

साखळी पद्धतीने गुन्हे 
तिघा संशयितांनी चांदवड, नांदेडसह राज्यातील अन्य सहा शहरांमध्ये वेगवेगळ्या किमान १२ बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. २०१२ ते २०१३ या कालावधीत साखळी पद्धतीने हे गुन्हे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.