महिलेची चार लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - पेपरकप तयार करण्याचे यंत्र देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून चार लाख रुपये घेतले; परंतु ऐनवेळी यंत्र दुसऱ्यालाच विकून पैसे देण्यास चेन्नई येथील कंपनीने नकार दिला. या प्रकरणात मंगळवारी (ता. ३०) कंपनीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

तक्रारदार महिला कासलीवाल तारांगण, पडेगाव येथे राहते. त्यांनी चेन्नई येथील अविय्यार स्ट्रीट एक्कातूथांगल कंपनीकडून पेपरकप तयार करण्याचे यंत्र खरेदीसाठी मार्च २०१६ ला संपर्क साधला. कंपनीने त्यांना सहा लाख साठ हजारांचे कोटेशन दिले. यंत्राची नोंदणी करण्यासाठी मे २०१६ ला बॅंक चेन्नईस्थित कंपनीच्या बॅंक खात्यात एक लाख रुपये भरणा केला. कंपनीकडे यंत्र आले, उर्वरित पैसे भरा व यंत्र घेऊन जा असे कंपनीच्या महिला प्रतिनिधीने सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिलेने पंधरा दिवसांनी तीन लाख रुपये कंपनीच्या खात्यात भरणा केला. यानंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधला, त्यावेळी यंत्र देण्यासाठी वॅटकीन क्रमांकाची गरज आहे, असे सांगितले, तक्रारदार महिलेला वॅटकीन क्रमांक मिळविण्याला पंधरा दिवस लागले. तक्रारदार महिलेने कंपनीच्या प्रतिनिधीकडे वारंवार संपर्क करून यंत्राची मागणी केली. त्यावर वॅटकीन क्रमांक मिळविण्यास उशीर झाला असून, हे यंत्र अन्य एका ग्राहकाला नगदी व्यवहारानंतर विकल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने क्रांती चौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.