शक्ती आणि भक्तीमुळेच समाजाचा खरा विकासः मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबादः जगामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्माचे ज्ञान आहे, या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे त्या ठिकाणी समाजाचा खरा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गंगापूर तालुक्‍यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा येथे आयोजित श्री सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज 170व्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमात आज (शुक्रवार) ते बोलत होते.

औरंगाबादः जगामध्ये ज्या ठिकाणी अध्यात्माचे ज्ञान आहे, या ज्ञानासोबत शक्ती आणि भक्ती आहे त्या ठिकाणी समाजाचा खरा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गंगापूर तालुक्‍यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा येथे आयोजित श्री सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज 170व्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता कार्यक्रमात आज (शुक्रवार) ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, महापौर भगवान घडामोडे, महंत रामगिरी महाराज, शांतीगिरी महाराज, महंत नारायण गिरी महाराज, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, सुभाष झांबड, बाळासाहेब मुरकुटे, मोनिकाताई राजळे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भक्तीच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आपली मानवता जिवंत आहे. या भक्तीच्या माध्यमातून अनेक घटक एकत्र येऊन अखंड हरिनामाच्या सप्ताहात रुपांतर झाले आहे. या सप्ताहाचे प्रमुख गंगागिरीजी महाराज तसेच रामगिरीजी महाराज यांच्यामुळे आपल्याला एक नवी उमेद मिळते. जीवनामध्ये सन्मार्गाने चालण्याची संधी मिळते आणि गुरुंच्या माध्यमातून जे अध्यात्माचे ज्ञान प्राप्त होते ते चिरंतन टिकणारे असते. मनुष्याला केवळ लौकीक ज्ञान आणि भौतिक संपत्ती प्राप्त होऊन फायदा नाही कारण ज्यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे त्यांना रात्री झोप येत नाही. मात्र बळीराजा हा आपला शेतीत राब-राब राबतो, रक्ताचं पाणी करतो त्याच्याकडे भौतिक संपत्ती नसली तरी हरिनामाचा जप केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप येते. त्याला बाकीची चिंता करण्याची गरज नाही कारण त्याला माहिती आहे, मी मेहनत करतोय तर माझा हरी माझी चिंता करतोय, ही ताकद केवळ अध्यात्मा मध्ये आहे.

आम्हाला शक्ती दे, आशिर्वाद दे
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, मी परमपुज्य गंगागिरी महाराजांना एकच आशिर्वाद मागतो की, राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच कर्जमाफीकडून कर्जमुक्तीकडे नेण्यासाठी आणि बळीराजाच्या जीवनात परिवर्तन यावे या करीता खऱ्या अर्थांने "आम्हाला शक्ती दे, आशिर्वाद दे' गंगागिरी महाराजांच्या "सरला' या बेटाच्या विकासासाठीच्या प्रस्तावाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन प्रस्तावाच्या मंजूरीसाठी मी स्वत: प्रयत्न करील, असे ते म्हणाले.

दहा लाख भक्तांचा सत्संग
या सप्ताहामध्ये प्रसादाच्या स्वरुपात 10 लाख भक्तांना बुंदीचे लाडू 8 मिनिटांमध्ये वाटण्याचा आणि एकाचवेळी 10 लाख भक्तांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होण्याचा असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना यावेळी प्रदान करण्यात आले. या हरिनाम सप्ताहासाठी सात दिवसांमध्ये राज्यातून जवळपास 25 ते 30 लाख भक्त येऊन गेले असून, आज सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला 10 लाख भक्तगण येथे उपस्थित असल्याचे आमदार तथा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत बंब यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news devendra fadnavis in gawali shiwra harinam saptah